Mumbai Metro Car Shed: मुंबई येथील आरेला पर्यायी कांजूरमार्गच्या जागेवर केंद्राचा दावा,  मेट्रो कारशेड जागेवरुन राज्य विरुद्ध केंद्र सरकार संघर्ष पेटण्याची चिन्हे
Metro | Representational Image (Photo Credits: Pixabay)

मुंबई मेट्रो कारशेड (Mumbai Metro Rail Car Shed) आरे (Aarey ) येथून ते कांजूरमार्ग येथील (Kanjurmarg) जागेवर हालवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाविकासआघाडी सरकारने घेतला. परंतू, याच जागेवरुन आता केंद्र सरकार (Central Government) विरुद्ध राज्य सरकार (State Government) असा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. कारण कांजूरमार्ग येथील जागेवर आता केंद्र सरकारने दावा सांगितला आहे. या जागेची मालकी आपल्याकडे असून, ही जागा मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणकडे हस्तांतरीत करण्याबाबतचा निर्णय रद्द करवा अशी सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. लोकसत्ता डॉट कॉमने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान,केंद्राच्या उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार (डीआयपीपी) मंत्रालयाने या जागेवर दावा सांगितल्याचे समजते. राज्य सरकारकडून या वृत्ताबाबत अद्याप कोणती प्रतिक्रिया आली नाही. परंतू, राज्य सरकार काय प्रतिक्रिया देते याबाबत उत्सुकता आहे. कुलाबा- वांद्रे-सिप्झ येथे मेट्रो ३ चे कारशेड उभारण्यात येणार होते. परंतू, ही जागा राखीव वन म्हणून जाहीर करत येथील मेट्रो कारशेड हे कांजूरमार्ग येथील जमीनवर उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केला.

आरे येथे कारशेड उभारण्यास शिवसेना सुरुवातीपासूनच विरोध करत होती. परंतू, विधानसभा निडणुकीच्या धामधुमीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या जागेवर मेट्रो कारशेड उभारण्याचा निर्णय रेटला असा आरोप करत ठाकरे सरकारने हे कारशेड कांजूरमार्ग येथे स्थनांतरीत करण्याचा निर्णय घेतला. (हेही वाचा, Mumbai Metro आजपासून पुन्हा प्रवाशांसाठी खुली; COVID-19 च्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना पाळावे लागतील ‘हे’ नियम!)

आरेतील कारशेड कांजूरमार्ग येथील जागेवर हालविण्याचा निर्णय जनतेला सांगताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, कांजूरमार्ग येथील जमीन कारशेडसाठी मोफत उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जनतेचा एक पैसाही वाया जाणार नाही. महत्त्वाचे म्हणजेमेट्रो -3 आणि लोखंडवाला-जोगेश्वरी-विक्रोळी- कांजूरमार्ग मेट्रो- 6 या मार्गांचेही या ठिकाणी एकत्रिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे जनतेच्या पैशांचा अपव्यय होणार नाही, असाही दावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला होता.

दरम्यान, कांजूरमार्ग येथील जागा ‘एमएमआरडीए’कडे हस्तांतरीत करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ही जागा ‘एमएमआरडीए’कडे हस्तांतरीत केली. आता तिथे मेट्रो कारशेड उभारण्याचे कामही सुरु झाले आहे. परंतू, आता ही जागा मिठागराची असल्याचे सांगत केंद्र सरकारने या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे आता ही जागा कोणाची याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.