Kishori Pednekar (Photo Credits: Facebook)

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांना मुंबईतीलच एका रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे. किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना सकाळपासूनच प्रकृती अस्वास्थ्य जाणवत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे समजते. पेडणेकर यांना प्रकृतीच्या नेमक्या कोणत्या तक्रारीमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, त्यांना सकाळपासूनच ताप येत होता. दोन दिवसांपूर्वीही त्यांची वैद्यकीय चाचणी झाली होती. त्यांचा कोरोना व्हायरस चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यांना मुतखड्याचा त्रास असल्याचे समजते.

महापौर किशोरी पेडणेकर या पेशाने मुळच्या नर्स आहेत. त्यामुळे कोरोना व्हायरस संकट काळात प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा त्यांनी नर्सचा गणवेश परिधान करत कोरोना रुग्णांची सेवा करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, महापौर या नात्याने त्यांनी मुंबईतील अनेक रुग्णालये आणि कोरोना हॉस्पीटल्सना भेटी दिल्या होत्या. अगदी जमीनीवर काम करणाऱ्या कोव्हिड योध्यांचे मनोबल वाढविण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले आहेत. किशोरी पेडणेकर यांचा नित्याने लोकसंपर्क येत असे. (हेही वाचा, International Nurse Day 2020: मुंबई महापौर किशोरी पेडणेकर ते बॉलिवूड अभिनेत्री शिखा मल्होत्रा कोरोना संकटात 'या' महिलांनी पुन्हा स्वीकारला रूग्णसेवेचा वसा! )

पेडणेकर यांना ताप आल्याने सध्या त्या स्वत:हूनच रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या आहेत. विविध चाचण्या केल्यानंतर येणारा अहवाल पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल. मात्र, अद्याप तरी त्यांना अॅडमीट केल्याचे वृत्त नाही. तपासणी अहवाल आल्यानंतरच त्यांना रुग्णालयात अॅडमीट करायचे किंवा नाही याबाबत निर्णय घेतला जाईल असे डॉक्टरांचे म्हणने असल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. झी 24 तास आणि टीव्ही 9 या वृत्तवाहिन्यांनी याबाबत वृत्त दिले आहे.