International Nurse Day: रुग्णांच्या सेवेत आयुष्य घालवलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल (Florance Nightingale) यांचा जन्मदिन म्हणजेच 12 मे हा दिवस जगभरात ‘नर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी इसवी सन 1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांची शु्श्रूषा केली होती. याआधी आणि यानंतर सुद्धा त्यांनी आपले संपूर्ण जीवन रुग्णांची शु्श्रूषा करण्यात अर्पण केले. त्यांचे हे कार्य लक्षात घेऊन त्यांचा जन्मदिन जागतिक परिचारिका दिन (International Nurse Day) म्हणून साजरा करण्यात येतो. आज जगभरावर कोरोनाचे संकट असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज सर्वांच्या लक्षात येत आहे. अशा वेळी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पण मूळ वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या अनेक महिलांनी परिचारिका म्हणून काम करण्यात पुन्हा सुरुवात केली आहे. मग त्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) असो वा बॉलिवूड अभिनेत्री शिखा मल्होत्रा (Shikha Malhotra) यासहित अनेक महिलांनी आपल्या रुग्णसेवेचा वसा पुन्हा स्वीकारत कामाला सुरुवात केली आहे. यातीलच काही महिलांविषयी या लेखातून जाणून घेऊयात.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर
मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील तयार रुग्णालयात परिचारिका म्ह्णून काम करण्यास पुन्हा सुरुवात केली आहे. याच क्षेत्रात काम करण्याचा त्यांना जवळपास ३२ वर्षांचा अनुभव आहे, इथून राजकारणात त्यांनी प्रवेश घेतला होता. या संकटाच्या काळात केवळ पदा मिरवत बसण्याऐवजी कोणत्या ना कोणत्या पद्धतीने या कामात हातभार लावणे आपले उद्दिष्ट आहे असे पेडणेकर यांनी म्हंटले आहे.
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) April 27, 2020
बॉलिवूड अभिनेत्री शिखा मल्होत्रा
बॉलीवूड अभिनेत्री शिखा मल्होत्रा (Shikha Malhotra). या लढाईमध्ये शिखा परिचारिका बनून रुग्णांची सेवा करत आहेत. बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी तिने एक वर्षाचे नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले आहे. आता हे प्रशिक्षण कोरोना संक्रमित रूग्णांवर उपचार करण्यासाठी कमी आले आहे आहे. शिखा ही सध्या हिंदुह्रुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर म्युनिसिपल हॉस्पिटल मध्ये काम करत आहे.
कल्याण डोंबिवली महापौर विनिता राणे
कोरोना व्हायरस रुग्णांच्या उपचारासाठी कल्याण डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे यांनी डोंबिवली मधील शास्त्री नगर रुग्णालयात परिचारिका म्हणून कामाला सुरुवात केली आहे. राणे यांनी मुंबईच्या नायर हॉस्पिटल मध्ये यापूर्वी काम केले होते.
दरम्यान, ब्रिटिश-भारतीय वंशाची मिस इंग्लड 2019 डॉक्टर भाषा मुखर्जी ही सुद्धा कोरोना व्हायरस काळात रुग्णसेवा करत आहेत. भाषा हिने हा किताब मिळवल्याचा काही वेळातच लिंकनशायर, बॉस्टन मधील पिलग्रिम हॉस्पिपटलमध्ये काम करण्यास सुरुवात सुद्धा केली होती. तिने सर्जनाची पदवी प्राप्त केली आहे. कोरोनाकाळात ती सुद्धा रुग्णांची सेवा करत आहे.
या संकटकाळात पुढे आलेल्या सर्व परिचारिकांना लेटेस्टली मराठी परिवाराकडून सलाम!