Local train service resumes for all in Mumbai (Photo Credits-ANI)

Mumbai Local Train Update:  कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे काही काळासाठी रेल्वे सेवा नागरिकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती. परंतु लॉकडाऊन जसा टप्प्याटप्पयाने उठवला गेला त्यानुसार काही नियम सुद्धा शिथिल करण्यात आले. तर मुंबई लोकल बद्दल बोलायचे झाल्यास त्या मधून सुरुवातीला फक्त अत्यावश्यक सेवासुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवास करण्याची मुभा दिली होती. त्यानंतर महिलांना ठरवून दिलेल्या वेळेत प्रवास करता येत आहे. पण आता सर्वसामान्यांसाठी आज पासून मुंबई लोकल धावणार आहे. याच पार्श्वभुमीवर दादर मध्ये प्रवाशांची लोकल पकडण्यासाठी सकाळ पासूनच रेल्वे स्थानकात गर्दी दिसून आली.(Mumbai Local Trains: मुंबई लोकलमधून 'या' वेळेत प्रवास केल्यास सर्वसामान्य नागरिकांना भरावा लागेल इतका दंड)

सर्वसामान्यांसाठी लोकल ट्रेनसाठी वेळा ठरवून दिल्या आहेत. त्यानुसार, नागरिकांना सकाळी 7 वाजताची पहिली ट्रेन, त्यानंतर 12 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत आणि रात्री 9 ते शेवटच्या लोकलने प्रवास करता येणार आहे. परंतु लोकलच्या या वेळा चुकवल्यास तर प्रवाशाला 200 रुपयांचा दंड भरावा लागणार असल्याचे आधीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचसोबत सरकारी सुचनांचे पालन न केल्यास कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.(Mumbai Local प्रवाशांना दिलासा! लॉकडाऊनपूर्वी काढलेल्या पासमध्ये मिळणार मुदतवाढ)

Tweet:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई लोकल सेवेला परवानगी दिलेल्या काही मर्यादित प्रवाशांसाठीच सुरु होती. मात्र, 1 फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, अशा वेळा ठरवून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मुंबई लोकलमधून प्रवास करता येईल. तसेच त्यांची होणारी गैरसोय सुद्धा दूर होणार आहे. याशिवाय, मुंबई आणि उपनगरातील विविध कार्यालये आणि आस्थापना यांनी कामाच्या वेळांमध्ये सुधारणा करावी जेणे करून सर्वांना सोयीचे होईल, असेही आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.