Mumbai Local | Photo Credits: Unsplash.com

उद्यापासून (1 फेब्रुवारी, सोमवार) सर्वसामान्यांसाठी मुंबई लोकल (Mumbai Local) सेवा सुरु होत आहे. यामुळे आनंदीत असलेल्या प्रवाशांसाठी अजून एक खुशखबर आहे. लॉकडाऊनपूर्वी काढलेल्या लोकल पासमध्ये मुदतवाढ मिळणार आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे पासची मुदत संपलेले अनेक प्रवासी असतील. त्यांना येत्या सोमवारपासून राहिलेल्या दिवसांची मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम (Western) आणि मध्य रेल्वेकडून (Central Railway) देण्यात आली आहे. (Mumbai Local 1 फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी प्रवासासाठी खुली पण केवळ 'या' वेळेत करता येणार प्रवास)

कोविड-19 संकटामुळे 24 मार्च 2020 पासून अचाकन बंद झालेली लोकल सेवा गेले 11 महिने बंद आहे. लॉकडाऊनपूर्वी अनेकांनी तीन, सहा महिने किंवा अगदी वर्षभराचेही पास काढले होते. मात्र लॉकडाऊनच्या काळात ही मुदत संपुष्टात आली. त्या सर्व प्रवाशांना पासमध्ये मुदतवाढ मिळणार आहे. (Mumbai Local सर्वसामान्यांसाठी खुली करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची जय्यत तयारी; सॅनिटायझेशनसाठी विशेष टीम सज्ज)

दरम्यान, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले की, कोरोना लॉकडाऊन काळात पासची मुदत संपली आणि लोकल प्रवासाची परवानगी नसल्याने ज्यांना मुदतवाढ मिळू शकली नाही. त्या सर्व प्रवाशांना 1 फेब्रुवारीपासून मुदतवाढ देण्यात येईल. त्यासंदर्भातील आदेशही रेल्वेला मिळाले आहेत.

सर्वसामान्यांना रेल्वे प्रवासाची मुभा मिळाली असली तरी ठराविक वेळेतच त्यांना प्रवास करता येणार आहे. त्याचबरोबर वेळेचे बंधन आणि कोरोना संबंधित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.