सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना विषाणू (Coronavirus) रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोविड-19 च्या मार्गदर्शक सूचनांचे योग्य पालन न केल्यास राज्यातील लोकांना आणखी एका लॉकडाउनला सामोरे जावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, मुंबई लोकल (Mumbai Local) 1 फेब्रुवारीपासून सामान्य लोकांसाठी सुरू झाल्यापासून कोरोनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. म्हणूनच की काय आता मुंबई लोकलने प्रवास करण्यासाठी लोकांमध्ये उदासीनता दिसू लागली आहे. सध्या पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रवासीसंख्येत एकूण 2 लाखांनी घट झाली आहे.
सध्या सामान्य लोकांना ठराविक वेळेनुसारच मुंबई लोकलने प्रवास करण्याची परवानगी आहे. म्हणजेच, आवश्यक सेवेतील कर्मचारी सोडून सामान्य लोकांसाठी प्रवास करण्याची वेगळी वेळ आहे. मात्र आता वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेने लोकलने प्रवास करण्याचा धसका घेतला आहे.
रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेवरील लोकलने 15 फेब्रुवारी रोजी 17,59,123 लोकांनी प्रवास केला होता. मात्र त्यानंतर 18 फेब्रुवारी रोजी ही संख्या 17,07,622 झाली. मध्य रेल्वेवर 15 फेब्रुवारी रोजी प्रवास करणाऱ्या लोकांची संख्या 23,39,131 होती, जी 18 फेब्रुवारीपर्यंत 20-21 लाखांपर्यंत खाली आहे. अशीच स्थिती एस लोकलचीही दिसून आली आहे. 15 फेब्रुवारीला एसी लोकलमधील प्रवासी संख्या 5875 इतकी होती, मात्र 18 फेब्रुवारीला हीच संख्या 1989 इतकी झाली. (हेही वाचा: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रुग्ण संख्या जास्त असणाऱ्या भागात कंटेनमेंट झोन जाहीर करुन कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवा; मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर यांचे आदेश)
दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत पालिकेने कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. बीएमसीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार तुम्हाला मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे. बीएमसीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, लोकल ट्रेनसह सार्वजनिक वाहतुकीच्या प्रवासादरम्यान मास्क घालणे आवश्यक असेल. मास्कशिवाय लोकलमध्ये प्रवास केला तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल.