Dr. Deepak Mhaisekar (PC - ANI)

गेल्या आठवड्यापासून राज्यातील विविध जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारने या जिल्ह्यात लॉकडाऊनची नवी नियमावली जाहीर केली आहे. अशातचं आता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ. दिपक म्हैसेकर (Dr. Deepak Mhaisekar) यांनी ज्या भागात रुग्णसंख्या जास्त आढळून येत आहे, अशा भागात कंटेनमेंट झोन (Containment Zones) जाहीर करुन कोविड चाचण्यांचे प्रमाण वाढवा, असे निर्देश दिले आहेत.

याशिवाय सोशल डिस्टन्सिग, मास्क लावणे आणि सॅनिटायझिंगचा वापर करणे, या त्रिसुत्रीचे काटेकोर पालन होण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करा, असे आदेशदेखील दिपक म्हैसेकर यांनी दिले आहेत. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दिपक म्हैसेकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील नियोजन व प्रतिबंधात्मक उपाययोजना या संदर्भात आढावा घेतला. (वाचा -पुण्यात सलग दुस-यांदा मास्क न घातलेला आढळलेल्या व्यक्तीस भरावा लागणार 1000 रुपयांचा दंड- जिल्हाधिकारी राजेश देशमुख)

यावेळी म्हैसेकर म्हणाले की, ज्या भागात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळून येत आहे, त्याठिकाणी चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. कटेंनमेंट झोनसह जिल्ह्यात गर्दी टाळण्यासाठी योग्य कारवाई करावी. तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांसह फ्रन्टलाईन कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण करावे. कोणीही लसीकरणापासून सुटू नये. कर्मचाऱ्यांना पहिला डोज घेतल्यानंतर न चुकता दुसरा डोस देण्यात यावा. प्रत्येकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करावे, अशा सूचनाही म्हैसेकर यांनी यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या.

याशिवाय अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुका, अमरावती महापालिका क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद आणि पांढरकवढा नगरपरिषद क्षेत्र आणि अकोला जिल्ह्यातील अकोट व मुर्तीजापूर तालुका आणि अकोला महापालिका क्षेत्र या भागामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. या भागास कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करा. कोरोना बाधित रुग्णांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करा. तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांची कोरोना चाचणी करा, असे निर्देशही म्हैसेकर यांनी यावेळी प्रशासकीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.