राज्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्व जिल्हाधिका-यांनी कंबर कसली असून पुणे (Pune) जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी देखील नवी नियमावली तयार केली आहे. पुणे शहरात मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले असून जर सलग दुस-यांदा मास्क न घातलेला व्यक्ती आढळल्यास त्याच्याकडून एक हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यात मास्क न घालता पहिल्यांदा आढळणाऱ्यास 500 रुपये दंड व तोच व्यक्ती पुन्हा जर मास्क न घालता आढळला तर त्याच्याकडून 1 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
त्याचबरोबर सोशल डिस्टंसिंग, वारंवार हात धुणे या नियमांचे पालन करणे देखील पुणेकरांना बंधनकारक राहिल. कोविड -19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने पारीत केलेले आदेश, निर्देश, एओपी इत्यादींचे प्रभावी अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या सही, शिक्क्यानिशी परिपत्रक काढण्यात आलं आहे.हेदेखील वाचा- Coronavirus Cases in Mumbai: मुंबईत मागील 24 तासांत आढळले 800 हून अधिक कोरोनाचे रुग्ण
उपविभागीय अधिकारी व तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचाय समिती, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, नगरपरिषद यांनी त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्लासेस, खासगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा/ विद्यालय, महाविद्यालय, नाट्यगृह, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने व इतर गर्दी होणारी स्थळे या ठिकाणी वेळोवेळी अचानक भेट देऊन तपासणी करावी.
पुण्यात मागील 24 तासांत 1015 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 3,96,582 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 6 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा एकूण आकडा 9171 वर पोहोचला आहे. सद्य घडीला पुण्यात 6362 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान मुंबईतही मागील 24 तासांत कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली वाढ ही 800 च्या पार गेली आहे. मुंबईत (Mumbai) 823 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 3,17,310 इतकी झाली आहे.