Mumbai Local Ladies Special (Photo Credits: File Image)

मुंबई रेल्वे विकास महामंडळाला (Mumbai Rail Vikas Corporation), मध्य रेल्वे (CR) मधील 11 आणि पश्चिम रेल्वेवरील (WR) 8 स्थानकांच्या नूतनीकरणासाठी (Revamp) रेल्वे बोर्डाकडून मान्यता मिळाली आहे. या नुतनीकरणासाठी तब्बल 947 कोटींचा खर्च येण्याचा अंदाज आहे. एमआरव्हीसीने आधीच काही स्थानकांच्या नव्या डिझाइनची योजना सुरू केली आहे, ज्यायोगे सामाजिक अंतर राखण्यासाठी गर्दी कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. या बहु-कोटी प्रकल्पासाठी कागदी कामे चालू असताना, लॉकडाऊन दरम्यान, 19 पैकी 14 स्थानकांच्या नवीन डिझाइनसाठी मंजुरी मिळाल्याचे एमआरव्हीसी अधिकाऱ्यांनी सांगितले.

ज्या स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार आहे अशांमध्ये, मध्य रेल्वेवरील भांडुप, मुलुंड, कसारा, जीटीबी नगर, चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, नेरळ, शहाद, ठाणे आणि डोंबिवली यांचा समावेश आहे. यासह पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल, खार, जोगेश्वरी, कांदिवली, भाईंदर, मीरा रोड, वसई आणि नालासोपारा यांचे नुतनीकरण होणार आहे. 19 स्थानकांचे नूतनीकरण हे 33,690 कोटी रुपयांच्या मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट-3 ए (Mumbai Urban Transport Project-3A) चा भाग आहे.

एमआरव्हीसी अधिकाऱ्यांनी सांगितले की, ते मुख्यत: लहान स्थानके पुन्हा तयार करत आहेत. लोकल गाड्या सर्वांसाठी चालू नसतानाही लॉकडाऊन दरम्यान जिथे गर्दी कायम होती अशा स्थानकांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे. पुढे त्यांनी सांगितले, 'आम्हाला स्थानकांवर लोकांसाठी मोठी जागा तयार करायची आहे. स्थानकांच्या प्रवेशद्वाराचे रुंदीकरण केले जाईल आणि तिकिट काउंटर, फूड स्टॉल्स आणि इतर सुविधा वरच्या डेकवर हलविल्या जातील.'

एमव्हीआरसी पुढे अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोविड-19 मुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती, परंतु बहुतेक स्थानकांच्या संकल्पनांच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे. ‘रेल यात्री परिषद’चे अध्यक्ष सुभाष गुप्ता म्हणाले, ‘मुंबईतील रेल्वे स्थानकांची, विशेषत: छोट्या रेल्वे स्टेशनची नव्याने रचना करण्याची गरज आहे. तसेच लोकांना स्थानकांमध्ये सहजपणे प्रवेश करता येईल आणि बाहेर पडत्या येईल, यासाठी रेल्वेनेही काही पावले उचलणे गरजेचे आहे.