मुंबई (Mumbai) मध्ये मानखुर्द रेल्वे स्थानकामध्ये (Mankhurd Railway Station) गर्डर उभारण्याचं काम आज 13 मे शनिवार, आणि रविवार 14 मे दिवशी हाती घेण्यात आलं आहे. या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी आज रात्री म्हणजे शनिवार 13 मे पासून मध्यरात्री 12.40 पनवेल लोकल सोबत अन्य लोकल फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. आज सीएसएमटी स्टेशन मधून 12.13 ही पनवेल साठी सुटणारी शेवटची लोकल असणार आहे.
मानखुर्द स्टेशन परिसरामध्ये शनिवारी मध्यरात्री 1 वाजून 5 मिनिटं ते रविवार पहाटे 4 वाजून 35 मिनिटांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असणार आहे. परिणामी अप आणि डाऊन मार्गावर लोकल फेर्या रद्द करण्यात आल्या आहेत. शेवटची लोकल देखील वेगळी असणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी याकडे लक्ष द्यावं असं प्रवाशांना आवाहन करण्यात आलं आहे. ब्लॉक नंतर पहिली लोकल रविवारी पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी पनवेल ते सीएसएमटी दरम्यान धावणार आहे.
रविवारी असणारा मेगाब्लॉक हा माटुंगा ते ठाणे आणि पनवेल ते वाशी दरम्यान असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते भाईंदर दरम्यान विकेंडला मध्यरात्री मेगाब्लॉक असल्याने रविवारी सकाळी वाहतूक सुरळीत धावणार आहे. नक्की वाचा: Summer Special Trains: मध्य रेल्वेकडून पुणे-रत्नागिरी-पनवेल मार्गावर अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा; जाणून घ्या वेळा व मार्ग .
मध्य रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक चं वेळापत्रक
रविवारी माटुंगा ते ठाणे दरम्यान मेगाब्लॉक सकाळी 11.05 ते 3.55 दरम्यान असणार आहे. या वेळेत धीम्या मार्गावर लोकल फेर्या जलद मार्गावर वळवल्या जातील. काही लोकल रद्द केल्या असून काही 15-20 मिनिटं उशिराने धावणार आहेत.
हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक चं वेळापत्रक
रविवारी हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी 11.05 ते 3.55 दरम्यान ब्लॉक असणार आहे. या दरम्यान सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील ठाणे ते पनवेलदरम्यान धावणाऱ्या अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द असतील. सीएसएमटी ते वाशीदरम्यानच्या फेऱ्याही रद्द राहणार आहेत. बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर, ठाणे ते वाशी/नेरुळदरम्यान लोकल धावतील.
दरम्यान पश्चिम रेल्वे मार्गावर वसई रोड ते भाईंदर दरम्यानचा ब्लॉक रात्रीच्या वेळेस असणार आहे. दिवसा वाहतूक सुरळीत राहणार आहे.