
मुंबईकरांना उष्णतेच्या लाटेपासून Heatwave) दिलासा मिळण्यासाठी आणखी दोन दिवस वात पहावी लागू शकते. येत्या दोन दिवसांत शहरातील कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवार, 9 मार्च ते सोमवार, 11 मार्च या कालावधीत उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. ही 12 दिवसांतली दुसरी उष्णतेची लाट आहे. मुंबईत याआधी 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी शेवटची उष्णतेची लाट आली होती, जेव्हा पारा 38 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला होता.
सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेसाठी कमाल तापमान 38 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर 12 मार्चपासून पारा कमी होण्याची शक्यता आहे; मात्र हवामान उष्ण आणि दमट कायम राहील. आयएमडीच्या 2025 च्या उन्हाळी अंदाजात मार्च महिन्यात उष्णतेच्या लाटा आणि एकूण हंगामात सामान्यपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात आली आहे. (हेही वाचा: Marol Fire Incident In Mumbai: मुंबईतील मरोळ परिसरात वाहनांना आग, तिघे गंभीर जखमी; एकाच वेळी कार, रिक्षा, दुचाकी जळून खाक)
कोकण प्रदेशासाठी 9 मार्च रोजी जारी केलेल्या आयएमडीच्या हवामान अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी अशा जिल्ह्यांमध्ये पुढील 2-3 दिवसांत कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होईल आणि त्यानंतर हळूहळू घट होईल. पुढील 2 ते 3 दिवसांत कोकणच्या काही भागात कमाल तापमान 36 ते 38 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आयएमडी मुंबईचे संचालक सुनील कांबळे म्हणाले, मुंबईत पूर्वेकडून आणि उत्तरेकडून वारे वाहत आहेत, त्यामुळे दुपारी आणि संध्याकाळी तापमान जास्त असते. 11 मार्चपर्यंत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 38 अंश सेल्सिअस आणि 23 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे.
उष्ण आणि दमट हवामानाचा विचार करून नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात येत आहे, ज्यामध्ये हायड्रेटेड राहणे आणि उष्णतेच्या दीर्घकाळ संपर्कात राहणे टाळणे समाविष्ट आहे. 9 मार्च रोजीच्या आयएमडीच्या हवामान अहवालानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात पारा सामान्यपेक्षा जास्त होता. उत्तर कोकणात कमाल तापमान 34 ते 37 अंश सेल्सिअस होते, जे सामान्यपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त होते. दक्षिण कोकणात कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस, उत्तर मध्य महाराष्ट्र 36 ते 38 अंश सेल्सिअस, दक्षिण मध्य महाराष्ट्र 33 ते 39 अंश सेल्सिअस आणि मराठवाड्यात 36 ते 38 अंश सेल्सिअस होते.