मुंबई: नोकरी मिळवायला मागितली मदत; बदल्यात मिळाले अश्लील व्हिडीओ, वाचा सविस्तर
Obscene Video

सध्याच्या काळात नोकरी ही जणू काही माणसाची प्राथमिक गरज आहे, आणि नोकरी शोधणे हा मोठा टास्क! अनेक जण नोकरी मिळवण्याच्या अपेक्षेत ओळखीतल्या ठिकाणी खडे टाकून ठेवतात, कोणतीच संधी हातून जाऊ नये म्हणून सर्वांना आपला संपर्क आणि माहिती देतात. मात्र असं करणं गोरेगाव (Goregaon) मधील एका महिलेच्या चांगलच अंगाशी आलं आहे. या महिलेने आपल्या सोसायटीतील एका गृहस्थाला आपला मोबाईल नंबर दिला होता. पण या माणसाने नो चक्क या महिलेला अश्लील व्हिडीओ (Obscene Video) पाठवायला सुरूवात केली. या प्रकाराने गांगरून गेलेल्या महिलेने आपल्या पतीला याबाबत सांगितले व या जोडप्याने लगेचच गोरेगाव पोलिसांकडे तक्रार केली. यांनतर रविवारी रात्री पोलिसांनी या गृहस्थाला ताब्यात घेतले आहे. संबंधित व्यक्तीचे नाव अनिल सिंह असून त्याचे वय 50 वर्ष आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित महिला ही आपले पती व दोन मुलांसह गोरेगाव येथे राहते. यापूर्वी ती एका मार्केटिंग कंपनीत काम करत होती मात्र मुलांच्या संगोपनासाठी मागील दोन वर्षांपासून त्यांनी करिअरमधून ब्रेक घेतला होता. काही आठवड्यांपूर्वी या महिलेने पुन्हा एकदा आपले करिअर सुरु करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने आपल्या मैत्रिणीकडे मदत मागितली होती, या मैत्रिणीने तिला अनिल सिंह यांचा संपर्क देऊन त्यांच्याशी बोलण्यास सांगितले.या महिलेने जेव्हा अनिल यांना संपर्क केला तेव्हा त्यांनी सुद्धा मदतीचे आश्वासन दिले, त्यानुसार लगेचच एका इंडस्ट्रीयल भागात कामाची ऑफर सुद्धा दिली. मात्र या महिलेने ही ऑफर सुरक्षेचे कारण देऊन नाकारली.

यानंतर अचानक एका दिवशी अनिल याने या महिलेच्या क्रमांकावर अश्लील व्हिडीओ पाठवायला सुरुवात केली, एकापाठोपाठ एक आठ व्हिडीओ पाहून साहजिकच ही महिला गांगरून गेली व तिने आपल्या पतीला याबाबत सांगितले.(लज्जास्पद! नागपूर मध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून शेजाऱ्याने केला 4 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार)

दरम्यान, संबंधित आरोपीने रविवारी गोरेगाव पोलिसांसमोर आपला गुन्हा कबुल केला आहे. अनिल सिंह यांच्यावर पोलिसांनी आयपीसी कलम 354 अंतर्गत लैंगिक शोषण, आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.