मुंबईमधील (Mumbai) गल्ल्यांच्या अस्वच्छतेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आक्रमक झाले आहेत. माझगांव डॉक येथील कार्यक्रमाहून परतत असताना मुख्यमंत्री शिंदे यांना या परिसरात काही ठिकाणी राडारोडा, अस्वच्छता, कचरा आढळला. त्याची दखल घेत, तेथूनच मुख्यमंत्री शिंदे यांनी आयुक्त डॉ. चहल यांना दुरध्वनीद्वारे संपर्क केला. तसेच या परिसरातीलच नव्हे, तर मुंबईतील सर्व रस्ते, गल्ली बोळ, छोटे रस्ते स्वच्छ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
‘मुंबईत कुठेही रस्त्यावर कचरा दिसता कामा नये. याची काळजी घ्या. राडारोडा आणि कचरा त्वरीत हटवा. यासाठी पालिकेचे सर्व सहायक आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, स्वच्छता निरीक्षक- स्वच्छता कर्मचारी अशा सर्व यंत्रणांना कामाला लावा. शहरातील ज्या-ज्या ठिकाणी भिंतींचे सुशोभिकरण करण्याचे काम अपूर्ण आहे, ते त्वरीत पूर्ण करा,’ अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.
यावर माझगाव डॉक परिसरातील अस्वच्छता प्रकरणी तेथील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच येत्या सात दिवसांमध्ये मुंबईतील सर्व वॉर्ड आणि त्यांचा परिसर, सर्व समुद्र किनारे यांची स्वच्छता युद्ध पातळीवर हाती घेण्यात येईल, असेही डॉ. चहल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. चहल म्हणाले, ‘मुंबईतील स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. ही बाब मुंबई पालिकेच्या स्वच्छता विभागाने गांभिर्याने घ्यावी. स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.’
त्यानंतर आता मुंबईच्या रस्त्यांच्या स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ नागरी अधिकार्यांना दररोज दोन तास घालवण्याचे निर्देश बीएमसीने दिले आहेत. संध्याकाळी उशिरा जारी केलेल्या प्रकाशनात, नागरी संस्थेने म्हटले आहे की, चहलने वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यांना स्वच्छता सुनिश्चित करण्यास सांगितले. सह महापालिका आयुक्त, उपमहापालिका आयुक्त, विविध वॉर्डांचे सहाय्यक महापालिका आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी एक तास प्रत्यक्ष भेटी देऊन गल्ल्या आणि रस्त्यांच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे. (हेही वाचा: अंबड येथे मराठा आरक्षणाबाबतच्या आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, शासनाकडून चौकशीचे आदेश)
चहल यांनी अधिका-यांना सार्वजनिक शौचालये दिवसातून दोनदा स्वच्छ केली जावीत याची खात्री करण्याचे निर्देश दिले आणि या कामात निष्काळजीपणा दाखविणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. नागरिकांना आनंददायी अनुभव देण्यासाठी महानगरातील अनधिकृत बॅनर, पोस्टर्स आणि होर्डिंग्ज हटवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली पाहिजे, असे चहल यांनी नागरी अधिकाऱ्यांना सांगितले.