Jalna Maratha Reservation Protest (संग्रहित संपादित प्रतिमा)

महाराष्ट्रातील जालना (Jalna) जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी हिंसक वळण लागले. या हिंसाचारात पोलीस कर्मचाऱ्यांसह सुमारे 10-12 जण जखमी झाले आहेत. अंबड तालुक्यातील धुळे-सोलापूर रस्त्यावरील एका गावात ही घटना घडली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चाचे निमंत्रक मनोज जरंगे यांच्यासह 10 जण धरणे आंदोलनाला बसले होते. शुक्रवारी पोलिसांनी उपोषण करणाऱ्या आंदोलकांना अटक करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी विरोध केल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला. यावर आंदोलकांनी दगडफेक केली. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करून त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.

जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांनी हवेत काही राऊंड गोळीबार केल्याचा दावाही गावकऱ्यांनी केला, मात्र अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला नाही. घडल्या प्रकारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आणि या हिंसाचाराची उच्च पातळीवर चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी रास्त, न्याय्य मागणी आहे. या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड येथे किंवा राज्यात कुठेही होणाऱ्या शांततामय आंदोलनाला आमचा, राज्यातील नागरिकांचा पाठिंबा आहे. मराठा आरक्षणाचा लढा रस्त्यावर आणि न्यायालयातही तितक्याच ताकदीने लढण्याची आपली सगळ्यांची भूमिका आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट आणि सामूहिक प्रयत्न गरजेचे आहेत. यावरच आंदोलनाचे यश अवलंबून आहे. जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेची सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात येईल आणि दोषी पोलिसांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.’

(हेही वाचा: माणुसकीला काळीमा! जोडप्याने 10 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला 5 दिवस बाथरूममध्ये कोंडले; वीज अधिकाऱ्यांनी केली सुटका, प्रायव्हेट पार्टसवर भाजल्याचा जखमा)

उपमुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील मराठा आंदोलनाने लोकशाही व्यवस्थेत शांततामय आंदोलनाचा आदर्श निर्माण केला आहे. हा आदर्श आणि गौरवशाली परंपरा कायम ठेऊन, कायदा सुव्यवस्था कायम राखत लोकशाही मार्गानेच हे आंदोलन पुढे जाईल, याची काळजी महाराष्ट्राच्या भल्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल. राज्य शासन आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जण मराठा आंदोलकांच्या सोबत आहे. अंबड येथील घटनेतील दोषी पोलिसांवर निश्चित कारवाई करण्यात येईल, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. राज्यात परिस्थिती बिघडणार नाही, शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठा आंदोलक आणि राज्यातील नागरिकांना केले आहे.