मुंबई पोलिसांनी केला बाळ चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, तिघांना अटक
(Image Courtesy: Archived, Edited, Symbolic Image)

मुंबई: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)  अॅन्टॉप हिल (Antop Hill) परिसरातून तिघांना बाळ चोरीच्या संशयातून अटक केली आहे. मागील काही दिवसांपासून या प्रकारच्या अनेक घटना सातत्याने समोर येत होत्या, ज्यात पोलिसांनी आतापर्यंत अगोदरच 14 जणांना अटक केली होती. या पाठोपाठ आता लहू निवातकर (52) सुरैया खान (37) आणि प्रीती शीताप (42) या तिघांची देखील जेल मध्ये रवानगी करण्यात आली आहे. या टोळीकडून 2  लहानग्यांची सुटका करण्यातही पोलिसांना यश मिळाले आहे. यातील एक बाळ हे चार वर्षाचे असून निवातकर हे त्याला स्वतःच्या बाळासारखे वाढवत होते मात्र काहीच दिवसात हे बाळ तब्बल 2  ते 5  लाखाच्या किमतीत एखाद्या मूळ होत नसलेल्या जोडप्याला विकण्याचा त्यांचा कट होता.

प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी 11 जुलै ला झुलेहुमा दळवी नामक एका महिलेला अटक केली होती, चौकशी दरम्यान तिने आपण 2014 मध्ये एक बाळ निवातकर यांना 2.5 लाखाला विकल्याची कबुली दिली होती, या कबुलीनंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला व पोलिसांनी निवातकर यांचं घरी तपास करून या चिमुकल्याची सुटका केली. दरम्यान, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत तसेच बाळाचे खरे आई वडील शोधण्यासाठी त्याची DNA टेस्ट करण्यात येणार आहे.

यापूर्वी चेंबूर मध्ये सुद्धा बाळ चोरी करणारी एक टोळी पोलिसांच्या तावडीत सापडली होती, या मध्ये तीन महिला व एका पुरुषाचा समावेश होता, या तिन्ही महिला याआधी विविध रुग्णालयात काम करत होत्या. या टोळ्या गरीब पालकांना आपल्या मुलाच्या चांगल्या संगोपनाचे आमिष दाखवून मुले घेतात आणि मग हीच मुले वंध्यत्वाचा त्रास असलेल्या जोडप्यांना अवैध पद्धतीने लाखो रुपयात विकतात.