मुंबई मध्ये Provident Fund परत करण्याच्या भूलथापा मारत 72 वर्षीय व्यक्तीची 3 लाखांची फसवणूक
EPFO (Photo Credits-Facebook)

पीएफ रिटर्न (Provident Fund) करण्याचा बहाणा करत मुंबईतील पवई (Powai) भागात एका 72 वर्षीय व्यक्तीची 3 लाख रूपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पवई पोलिस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. फसवणूक करणार्‍या व्यक्तीने आओअण ईपीएफओ चे कर्मचारी (EPFO Officials) असल्याचं सांगितलं. पीडीत व्यक्तीचे 6 लाख रूपये त्यांना पीएफ (PF) स्वरूपात बाकी असल्याचं सांगत ते ट्रान्सफर करण्यासाठी काही चार्ज लागेल असं सांगत त्याने गंडा घातल्याचं समोर आलं आहे.

7 डिसेंबर दिवशी उर्मिला ठाकूर नामक महिलेने फसवणूक झालेल्या व्यक्तीला कॉल केला होता. तिने आपण ईपीएफओ ऑफिस दिल्ली चे कर्मचारी असल्याचं सांगितल. त्यांच्या कडे 6 लाख रूपये जमा असल्याचं सांगितलं. तसेच समोरच्या व्यक्तीचा आपल्यावर विश्वास बसावा म्हणून त्यांची पेंशन चारकोप बॅंकेतून रिलीज होत असल्याचंही सांगितलं. त्यामुळे 72 वर्षीय वृद्धाचादेखील त्या बोलण्यावर विश्वास बसला. हे देखील नक्की वाचा: EPFO कडून अलर्ट जाहीर, सोशल मीडिया युजर्सने 'या' गोष्टी लक्षात न ठेवल्यास होईल मोठे नुकसान .

महिलेने एका कम्युनिकेशन ऑफिसरचा नंबर दिल्यानंतर त्याच्याशी बोलताना सुरूवातीला 5230 रूपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. पुढे एक एक बहाणे काढत पैसे उकळण्यात आले. एकदा 90,684 रूपये CGST charges आणि वेगवेगळे ट्रान्सफर चार्जेस म्हणून ₹87, 000 देण्यास सांगितल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे. असे फ्री प्रेस जर्नलच्या वृत्तामध्ये सांगितले आहे.

पुढील दोन आठवड्यात वृद्ध व्यक्तीने अंदाजे 3.04 लाख रूपये भरले होते. यानंतर ही 'त्या' व्यक्तीकडून पैशांची मागणी सुरूच होती. त्यानंतर मात्र 72 वर्षीय फसवणूक होत असलेल्या व्यक्तीला संशय आला आणि त्याने वांद्रे येथील ईपीएफओ ऑफिस गाठले. तेथे आपल्या सोबत मोठा स्कॅम झाल्याचं त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी पोलिस स्टेशन गाठले.

पोलिसांनी या प्रकरणी आयपीसी 419,420,आयटी अ‍ॅक्ट सेक्शन 66सी, 66 डी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक पोलिस तपास सुरू आहे.