मुंबई: कांदिवली जवळ गर्डर कोसळून मेट्रो कामगाराचा मृत्यू
Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

मुंबईमध्ये आज कांदिवली भागात मेट्रो लाईन 2A येथे गर्डर अंगावर पडून 25 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. दहिसर ते डी. एन. नगर मेट्रोसाठी ट्रेलरवरून गर्डर नेताना तो कोसळला आणि एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. समता नगर पोलिस स्टेशनजवळ हा अपघात 3च्या सुमारास झाल्याचं वृत्त आहे. ट्रेलरची जोडणी पीन पुलरमधून तुटला आणि गर्डर मागील वाहनावर कोसळला.यामध्ये अर्शद शेख याचा मृत्यू झाला. अर्शद हा मे. जे. कुमार (J. Kumar) या कंपनीसाठी काम करत होता. कंस्टक्शन काम पाहण्यासाठी त्याची नेमणूक सिव्हील कॉन्ट्रॅक्टर म्हणून करण्यात आली होती.

एमएमआरडीए कडून अर्शदच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाईल, तसेच हा अपघात दुर्दैवी असल्याचेही दिलीप कवाठकर या MMRDA अधिकार्‍याने ANI या वृत्त संस्थेशी बोलताना दिली आहे. दरम्यान ट्रेलरच्या चालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई मेट्रो लाईन- 3 (Mumbai Metro Line 3) येथील भोगद्याजवळ काम सुरु असताना मोठा दगड कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती.