ST Bus Fare Hike: लालपरीचा प्रवास महागणार; एसटी बसची 17 टक्क्यांनी भाडेवाढ
ST Bus | (Photo Credits: MSRTC)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (Maharashtra State Road Transport Corporation) आजपासून एसटी बसेस (ST Buses) च्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आज (25 ऑक्टोबर) मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू केले जाणार आहेत. डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने एमएसआरटीसी (MSRTC) च्या भाडेवाढीला आदल्या दिवशी झालेल्या बैठकीत मान्यता दिल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

"कोरोना व्हायरस संकट आणि त्यामुळे देशभरात लागलेला लॉकडाऊन याचा जबरदस्त फटका  एमएसआरटीसी ला बसला. तसंच इंधनदर वाढीमुळे तोटा भरुन काढण्यासाठी भाडे वाढ करण्यात येत आहे. भाडेवाढीमुळे अतिरिक्त 50 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे," असे राज्य परिवहन उपक्रमाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी पीटीआय (PTI) ला सांगितले. (हे ही वाचा: मुंबईकरांचा बसप्रवास होणार अधिक सुखकर; BEST Bus साठी 27 कॉरिडॉर मार्ग कार्यान्वित)

"डिझेलच्या दरवाढीमुळे आम्ही 17.17 टक्के भाडे वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होतील. एमएसआरटीसीने तीन वर्षांनंतर भाडेवाढ केली आहे," असेही त्यांनी सांगितले. सध्या  एमएसआरटीसीकडे 95,000 कर्मचारी आणि 16,000 बसेसचा ताफा आहे. इंधनच्या वाढत्या किंमतीमुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी देखील नुकतीच दरवाढ केली आहे. (आजपासून Mumbai International Airport T2 ते दक्षिण मुंबई BEST च्या इलेक्ट्रिक बस प्रवाशांसाठी सुरू)

दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने वाढणारे दर, गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती आणि एकंदर महागाई यामुळे सर्वसामान्य अतिशय त्रासले आहेत. यातच आता लालपरीचा प्रवास महागल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ पोहचणार आहे.