एसटी महामंडळाकडून (MSRTC) दिवाळी मध्ये प्रस्तावित 10% हंगामी भाडेवाढ रद्द झाली आहे. दिवाळी मध्ये सणांचे दिवस आणि शाळा-कॉलेजना असणार्या सुट्ट्या यामुळे हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे दिवाळी मध्ये गावी जाणार्यांना अतिरिक्त खर्चाशिवाय प्रवास करता येणार आहे. यंदा 28 ऑक्टोबरला वसूबारस पासून दिवाळीच्या सणाला सुरूवात होत आहे. तर 2 नोव्हेंबरला भाऊबीजेचा सण आहे. यंदा दिवाळी हंगामी भाडेवाढ 25 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान प्रस्तावित होती.
दिवाळी सुट्टी मध्ये प्रवाशांची गर्दी पाहता एसटी महामंडळाच्या ताफ्यात साध्या आणि वातानुकूलित नव्या बस देखील दाखल होणार आहेत. एसटीची 10 टक्के भाडेवाढ ही त्यांच्या विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होणार होती. पण, ती आता रद्द करण्यात आली आहे. मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरीसाठी भाडेवाढ लागू करण्यात आलेली नव्हती. दिवाळी सण आणि नंतर येणार्या सुट्ट्या पाहता आता एसटी कडून विशेष गाड्या सोडल्या जातील अशी अपेक्षा आहे. मुंबई-पुणे मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी 'शिवनेरी सुंदरी ही नवी योजना काही दिवसापूर्वी एसटी कडून काही दिवसांपूर्वी जाहीर केली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात सध्या विधान सभा निवडणूकीचेही दिवस आहेत. कालच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीमध्ये लहान गाड्यांना टोल माफ करण्यात आला आहे. आता आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दुपारी निवडणूकांच्या तारखा, निकालाची तारीख जाहीर केली जाणार आहे. तर आजपासूनच आचारसंहिता लागू केली जाणार आहे.