Shivneri Sundari: आतापर्यंत तुम्ही विमानामध्ये विमान सुंदरी पहिली असेल, मात्र आता महाराष्ट्र पहिल्यांदा बसमध्ये प्रवाशांनी मदत करण्यासाठी महिला मदतनीस नेमली जाणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका म्हणजेच, शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार (ज्यादा दर) न लावता प्रवाशांना चांगल्या सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे. असे प्रतिपादन एस टी महामंडळाच अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या 304 व्या बैठकीमध्ये केले.
एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली 304 वी संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई- शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली.
आता मुंबई-पुणे मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी 'शिवनेरी सुंदरी'-
— Maharashtra State Road Transport Corporation (@msrtcofficial) October 1, 2024
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ एसटीच्या 343 बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र’ या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार असून, अत्यंत माफक दरामध्ये बस स्थानकांवरील प्रवाशांसोबतच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित संस्थांना बस स्थानकांवरील 400 ते 500 चौसेमीची जागा उपलब्ध करून देण्यात येईल. तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना, पॅथॉलॉजी लॅब व औषध दुकान सुरू करून सेवा द्यावयची आहे. (हेही वाचा: Mumbai Metro Extended Train Services During Navratri: मुंबईकरांसाठी खुशखबर! नवरात्रौत्सवादरम्यान रात्री उशिरापर्यंत धावणार मेट्रो)
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणी या आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून, या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या 253 होणार आहे. तसेच एस टी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी, चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारून 10X10 आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन 2500 साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे, तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली.