
नुकतीच जगातील सर्वात श्रीमंत शहरांची (Most Expensive Cities) यादी जाहीर झाली आहे आणि या यादीमध्ये भारतामधील एका शहराचे नाव समाविष्ट झाले आहे. ज्युलियस बेअर लाइफस्टाइल इंडेक्सने निवासी मालमत्ता, कार, बिझनेस क्लास फ्लाइट, बिझनेस स्कूल, डिगस्टेशन डिनर आणि इतर लक्झरी यांचे विश्लेषण करून जगातील 25 सर्वात महागड्या शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे. अहवालानुसार, हाँगकाँग, लंडन आणि न्यूयॉर्कला मागे टाकत सिंगापूर प्रथमच श्रीमंत लोकांसाठी वस्तू आणि सेवांसाठी सर्वात महागडे शहर बनले आहे.
ज्युलियस बेअरच्या ग्लोबल वेल्थ अँड लाइफस्टाइलच्या अहवालानुसार सिंगापूरमधील कार आणि आवश्यक आरोग्य विमा जागतिक सरासरीपेक्षा 133% आणि 109% अधिक महाग आहेत. शांघाय, गेल्या वर्षी पहिल्या स्थानावर होते, ते यंदा दुसऱ्या स्थानावर घसरले. तिसऱ्या स्थानावर हाँगकाँगचा नंबर लागतो. त्यानंतर लंडन आणि न्यूयॉर्क ही शहरे आहेत. पुढील 5 शहरांमध्ये मोनॅको, दुबई, तैपेई, साओ पावलो आणि मियामी यांचा नंबर लागतो.
सलग चौथ्या वर्षी आशिया हा जगातील सर्वात महागडा प्रदेश राहिला आहे. तर युरोप, मध्य पूर्व आणि आफ्रिका हे सर्वात परवडणारे प्रदेश आहेत. हेन्ले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2023 मध्ये असे दिसून आले आहे की, सिंगापूर श्रीमंत भारतीयांसाठी सर्वाधिक मागणी असलेला देश म्हणून कायम आहे. निवासाची वाढती मागणी, प्रिमियम शालेय शिक्षण खर्च आणि राहणीमानाचा उच्च खर्च यामुळे सिंगापूर हे महागडे शहर ठरले आहे. (हेही वाचा: India-Thailand Highway: आता भारतामधून रस्तेमार्गाने थायलंडला जाता येणार; कोलकाता-बँकॉक महामार्ग येत्या 4 वर्षात सुरू होण्याची शक्यता)
या यादीत स्थान मिळवणारे मुंबई हे एकमेव भारतीय शहर ठरले आहे. मुंबई 18 व्या क्रमांकावर आहे आणि येत्या काही वर्षांत त्यामध्ये आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे. मागील वर्षी मुंबई 24 व्या क्रमांकावर होती. जगातील 25 शहरांचा समावेश असलेल्या यादीत जोहान्सबर्ग सर्वात तळाशी आहे.