उन्हाने त्रासलेला प्रत्येकजण आणि बळीराजा अगदी आतुरतेने पावसाची प्रतिक्षा करत आहे. मात्र राज्यात दुष्काळ असताना आता मान्सूनचं आगमन लांबवणीवर पडलं असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. साधारणपणे महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होतो. यंदा देखील 6 जून रोजी मान्सून राज्यात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र आता मान्सून लांबवणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात येत आहे. 8 जून पर्यंत मान्सून पूर्वीच्या पाऊस येणार नसल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
मान्सून अंदमानात दाखल झाला असला तरी त्याची पुढील वाटचाल सावकाश होणार आहे. त्यामुळे केरळात जूनच्या पहिल्या आठवड्यानंतर मान्सून दाखल होईल. मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर 8 दिवसांनी त्याचे महाराष्ट्रात आगमन होईल.
उशिरा दाखल होणाऱ्या मान्सूनमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हवामानाच्या सल्ल्यानुसार शेतीचे नियोजन करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.