Sharad Pawar And Raj Thackeray (Photo Credit: Twitter)

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या (Pandharpur-Mangalwedha Assembly By-Elections) रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. तसेच अनेक राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (Maharashtra Navnirman Sena) राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress Party) पाठिंबा दर्शवला आहे. मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त पाठिंबाच जाहीर केलेला नाही. तर, मनसेचे नेते मतदारसंघात फिरून भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांचा प्रचारही करणार आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे आणखी जड झाले आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेसने भगीरथ भारत भालके यांना उतरवले आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या निवडणुकीसाठी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंढरपूरमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पंढरपूरात सभा घेतल्या होत्या. हे देखील वाचा- Mumbai: डोळा मारणे आणि फ्लाइंग किस म्हणजे लैंगिक छळ, कोर्टाने आरोपीला सुनावली एका वर्षाची शिक्षा

दरम्यान, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांना टक्कर देण्यासाठी समाधान आवताडे यांना तिकीट दिले आहे. भाजपमध्ये या पोटनिवडणुकीचे अनेक दावेदार होते, तरी पक्षाने ही उमेदवारी समाधान आवाडे यांना दिली आहे. आवताडे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. तर, 2014 मध्येही त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, या दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले होते.