Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या भाषणावर सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ, किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
Jayant Patil, Supriya Sule, Sanjay Raut, Chhagan Bhujbal, Kishori Pednekar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथील मनसे (MNS) मेळाव्यात केलेल्या भाषावर शिवेसना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने जोरदार टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी राज ठाकरे यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), जयंत पाटील (Jayant Patil), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनीही जोरदार टीका केली आहे.

शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय हेडलाईन होत नाही- सुप्रिया सुळे

राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार यांच्यावर बोललल्या शिवाय हेडलाईन होत नाही. त्यामुळे ते शरद पवार यांच्यावर बोलत असतात. त्यांच्याकडे विकासावर बोलण्यासाठी मुद्देच राहिले नाहीत. पाठीमागच्या दोन-अडीच वर्षांमध्ये महाविकासआघाडीने विकासाचे अनेक मुद्दे पूर्ण केलेत. त्यामुळे विकासावर बोलण्यासाठी त्यांच्यावर काहीच नाही. त्यामुळे आता ते अशा प्रकारची टीका करताना दिसत असल्याचे सुप्रिया यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Sharad Pawar on Raj Thackeray: शरद पवार यांचे राज ठाकरे यांना सडेतोड प्रत्युत्तर; 'चार-पाच महिने गायब असतात मग अचानक व्याख्यान देतात')

ईडीमध्ये बोलावल्यानंतर इंजिन वेगळ्या ट्रॅकवर गेले- छगन भुजबळ

राज ठाकरे बोलतात चांगले. त्यामुळे लोक त्यांना ऐकायला जातात. पण ते बोलतात वेगळे वागतात वेगळे. ईडीने त्यांना बोलावल्यावर त्यांचे इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेले. त्यांचा कोहीनुर टॉवरच एकदम हालायला लागलाला आहे. अडीच वर्षे ते गप्प राहिले आणि अचानक त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका सुरु केली. त्यांनी अचानकच ट्रॅक बदलला, असा टोला छगन भुजबळ यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

मनसेच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडुळ बाहेर निघाले

मुंबईच्या माहापौर किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे यांच्यावर विखाली भाषेत टीका केली आहे. अनेक मनसे कार्यकर्त्यांनी आमच्याकडे राज ठाकरे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दोन वर्षे बोलायला मिळाले नाही. त्यामुळे तुंबलेल्या मोरीतून काहीतरी बाहेर निघेल असे वाटले होते. परंतू, मनेसच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचे गांडुळ बाहेर पडले, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.

विझत चाललेल्या लोकांबद्दल बोलण्याची आवश्यकता नाही- जयंत पाटील

'लाव रे तो व्हिडिओ' असे म्हणणारे राज ठाकरे गेले कुठे? शरद पवार यांच्यावर बोलल्याशिवाय यांना प्रसिद्धी मिळत नाही. त्यामुळे मग त्यांच्यावर काहीतरी बोलण्याचा प्रकार सुरुआहे. विझत चाललेल्या लोकांवर फार काही बोलण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवाजी पार्क येथील कालच्या सभेत भाजपचा स्पीकर वाजत होता. खरे म्हणजे आम्हाला वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करावा लागेल की, एखाद्याला इतक्या उशीराने अक्कलदाढ कशी काय येते? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.