मनसेच्या दादरमधील 'राजगड' परिसरातील मुख्यालयासमोर फेरीवाले बसविण्यास विरोध; मुंबई महापालिकेच्या धोरणाविरोधात काढला मोर्चा
MNS-march against ferrywala-policy (PC - Twitter)

मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्याच्या (Maharashtra Navnirman Sena) दादरमधील 'राजगड' परिसरातील मुख्यालयासमोर 100 फेरीवाले बसविण्याचा निर्णय घेतल्याने मनसेने या धोरणाचा विरोध केला आहे. तसेच या धोरणाविरोधात मनसेने आज दादरमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी मनसैनिकांनी महापालिकेने आपला निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. नितीन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी मनसेच्यावतीने या मोर्चाचे नेतृत्व केलं.

मुंबई महापालिकेच्या नव्या फेरीवाला धोरणानुसार, फेरीवाल्यांना बसण्यासाठी काही ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. त्यात मनसेचं मुंबईतील मुख्यालयासमोरील फुटपाथचाही समावेश आहे. मनसेच्या मुख्यालयापासून ते दादरच्या दिशेपर्यंत फेरीवाले बसविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेत आज दादरमध्ये मोर्चा काढला. या मोर्चात मनसेचे शेकडो कार्यकर्ते सामिल झाले होते. यावेळी मनसैनिकांनी महापालिका प्रशासन आणि शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. (हेही वाचा - मध्य प्रदेश: छिंंदवाडा मध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केला संताप)

दरम्यान, यावेळी नितीन सरदेसाई यांनी सांगितलं की, मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे शिवसेनेचा मनमानी कारभार सुरू असून फेरीवाला धोरणही त्याचाच एक भाग आहे. प्रशासनाने नागरिकांना, सर्वसामान्य रहिवाशांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही या धोरणाचा निषेध करत आहोत. राजकीय पक्षाच्या कार्यालयाबाहेर फेरीवाले बसविण्याचं कारण काय? असा प्रश्नही नितीन सरदेसाई यांनी पालिका प्रशासनाला विचारला आहे.