राज ठाकरे यांच्याकडून विधान सभेसाठी तयारी सुरु, 13 मे रोजी ठरवणार पक्षाची रणनिती
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष (file photo)

देशात सध्या लोकसभा निवडणूकीचे (Lok Sabha Elections) वारे वाहत असून अद्याप दोन टप्प्यातील मतदान बाकी आहे. तत्पूर्वी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. मात्र राज ठाकरे यांच्याकडून आता विधानसभेसाठी (Vidhan Sabha) तयारी सुरु झाली आहे. येत्या 13 मे रोजी राज ठाकरे आपल्या पक्षाची रणनिती विधानसभेसाठी काय असणार हे स्पष्ट करणार आहेत.

13 मे रोजी राज ठाकरे ठाणे येथे दौऱ्यावर येणार असून त्यावेळी महाराष्ट्राती प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचवेळी राज ठाकरे विधानसभेसाठी आपली रणनिती काय असणार हे जाहीर करणार आहेत. तर यंदाच्या लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. त्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर प्रत्येकवेळी टीका करताना दिसून आले. तसेच राज ठाकरे यांच्या सभांनासुद्धा जनतेकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले.(राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व सभांचा खर्च सादर करावा, निवडणुक आयोगाचे आदेश)

तर आता 23 मे नंतर राज ठाकरे तीन महिने महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरे करणार असल्याचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. मात्र आता ठाण्यात होणाऱ्या मेळाव्यात राज ठाकरे विधानसभेसाठी नेमकी कोणती भुमिका घेणार याबद्दल राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.