मनसे (MNS) जिल्हाध्यक्ष आणि कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांनी एका पानटपरी वाल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. यावरून आज, हर्षवर्धन यांच्यावर क्रांतिचौक पोलीस स्टेशन मध्ये ऍट्रॉसिटी (Atrocity) दाखल करण्यात आली आहे. या एकूण प्रकारावर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन यांनी हे ऍट्रॉसिटी वैगरे आपल्या विरुद्ध सुरु असणारे षडयंत्र असल्याचे म्हंटले आहे, केवळ शिवसेनेच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने अशी कटकारस्थाने केली जातायत पण मला तुरुंगात जरी टाकलं तरी मी माझी भूमिका सोडणार नाही त्यावरच ठाम राहीन असे म्हंटले आहे. हर्षवर्धन यांच्या विरुद्ध संबंधित पानटपरी मालक नितीन रतन दाभाडे (वय 30 ) याने तक्रार दाखल केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अदालत रोडवरील क्रांतीनगर सिग्नल येथे नितीन दाभाडे याने पानटपरी टाकून त्याच्यावर निळा झेंडा लावला होता. ही टपरी अधिरकुत असल्याचे म्हणत हर्षवर्धन जाधव यांनी ही पानटपरी काढण्यास सांगितली होती. पानटपरी न काढल्यास ठार मारण्याची धमकी देत त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली, असे दाभाडे यांनी तक्रारीत सांगितले आहे. दाभाडे याच्या तक्रारीवरून हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्ट आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, काल निवृत्ती देशमुख उर्फ कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या विरुद्ध सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांनी अशाच प्रकरणात वर्तक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, इंदोरीकरांनी आपल्या कीर्तनातून चर्मकार समाजाच्या बाबत आक्षेपार्ह्य विधाने करत संविधानाचा अवमान केला आहे आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे असे चव्हाण यांनी तक्रारीत म्हंटले होते, त्यामुळे जातीवाचक विधान केल्याच्या आरोपावरून इंदोरीकर महाराजांवर सुद्धा ऍट्रॉसिटी दाखल होण्याची शक्यता आहे.