MNS Horn Ok Agitation: महाविकास आघाडी सरकारला जागे करण्यासाठी मनसेचं 'हॉर्न वाजवा आंदोलन'
Raj-Uddhav Thackeray | (Facebook PTI)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग टाळण्यासाठी देशात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन (Lockdown) पाळण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. अनलॉक 1 सुरु झाला तरीदेखील रिक्षा, टॅक्सी आणि इतर वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे मनसेच्या वाहतूक सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. येत्या शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता मनसेने मुंबईमध्ये ‘हॉर्न वाजवा आंदोलन' (MNS Horn Ok Agitation) पुकारले आहे.

दरम्यान, मनसेच्या वाहतूक सेनेच्या वतीने या आंदोलनलात सहभागी होणाऱ्या सर्व रिक्षा, टॅक्सी तसेच इतर वाहनधारकांनी एक मिनिटे हॉर्न वाजवून सरकारला जागे करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या आंदोलनात राज्यातील रिक्षा, टॅक्सी, टेम्पो, ट्रक, बस, लक्झरी वाहने स्टँडवर एकत्र येऊन एक मिनिट हॉर्न वाजवणार आहेत. या आंदोलनात राज्यातील सर्व वाहतूक संघटना सहभागी होणार आहेत, असं मनसेच्या वाहतूक शाखेने सांगितलं आहे. (हेही वाचा - पुणे: हिंजवडीतील कोविड-19 रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन)

सध्या राज्यात रिक्षा, टॅक्सी सुरु नसल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात भाडे आकारण्यात येत आहे. कोविड 19 च्या नियमांनुसार, सरकारने आवश्यक सुरक्षा उपकरणे वापरुन रिक्षा, टॅक्सी सुरु करण्याची सरकारने परवानगी द्यावी. ज्या रिक्षा, टॅक्सी चालकांना शासनाने परवाना दिले आहेत, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ओला, उबेरसारख्या कंपन्यांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत नाही. रिक्षा, टॅक्सी चालकदेखील कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करतात. मग त्यांना परवानगी का नाही? असा प्रश्न मनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी विचारला आहे. (वाचा - Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात कोविड-19 चे किती रुग्ण? जाणून घ्या कोरोना बाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी एका क्लिकवर)

हॉर्न वाजवा आंदोलन हे राज ठाकरे यांची स्वतःची लढवय्या ओळख दाखवणारे आंदोलन असेल. महाराष्ट्र सैनिकांनी तसेच वाहनचालक मालकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे. आंदोलन करताना #MNSHornOKPlease हा हॅशटॅग वापरा आणि आंदोलन यशवी करा, असं आवाहनही संजय नाईक यांनी केलं आहे.