Chief Minister Uddhav Thackeray (PC - Twitter)

पुण्यातील (Pune) हिंजवडी (Hinjewadi) परिसरात विप्रो (Wipro) च्या वतीने उभारलेल्या सुसज्ज कोविड-19 रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आज ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. जागतिक माहिती तंत्रज्ञान, सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा कंपनी असलेल्या विप्रो लिमिटेड कंपनीने पुण्यात 450 बेडचं विशेष कोविड रुग्णालय उभारलं आहे. हे रुग्णालय उभारण्यासाठी कंपनीने राज्य शासनासोबत सामंजस्य करार केला आहे. पुण्यातील हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये हे विशेष कोविड रुग्णालय सुरु करण्यात आलं आहे.

पीपीपी तत्त्वावर अवघ्या महिना-सव्वा महिन्यात उभारण्यात आलेले देशातील हे पहिलेवहिले कोविड रुग्णालय केवळ पुण्यासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठीही समाधानाची बाब आहे. रुग्णालयांच्या उभारणीसाठी चीनचे उदाहरण दिले जाते, पण मुंबईत बीकेसी येथे अवघ्या 15 दिवसांत देशातले पहिले फिल्ड हॉस्पिटल उभारले आणि 1000 बेड्सची सोय केली. गोरेगावला नेस्को येथे जम्बो सेंटर सुरु केलं. लवकरचं नवी मुंबईतील सिडको प्रदर्शन केंद्रातील कोविड सेंटरही सुरु होणार असल्याचंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

केवळ फिल्ड हॉस्पिटल्स उभारून चालणार नाही, तर त्यात काम करायला डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ लागणार. तो देखील सर्व माध्यमांतून आम्ही तयार करीत आहोत. लॉकडाऊन उघडायला सुरुवात केल्यामुळे आमच्यासमोर आव्हान आहे. पण, सर्वांच्या मदतीने ते निश्चितपणे पेलू असा विश्वास मुख्यमंत्र्यांना यावेळी व्यक्त केला.(हेही वाचा - Coronavirus: 11 जून, सकाळी 10 वाजेपर्यंत कोरोना व्हायरस संदर्भात राज्याचा MEDD अहवाल काय सांगतो? राज्यासह देशात, जगात काय आहे स्थिती? घ्या जाणून)

विप्रोसारख्या नामवंत जागतिक कंपनीने स्वत:हून पुढे येत अशी अद्ययावत सुविधा निर्माण करण्याची तयारी दर्शविली. विप्रो सामजिक कार्यात सुद्धा किती वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने काम करते याचे ही रुग्णालय इमारत प्रतीक आहे. विप्रोने 1.8 लाख स्क्वेअर फुट जागेत उभारलेल्या 504 बेड्सच्या अद्ययावत COVID_19 केअर हॉस्पिटलमध्ये 18 व्हेंटिलेटर्स, आयसीयू सुविधा, दोन रुग्णवाहिका आणि इतर सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहेत. हे रुग्णालय आता समर्पित कोविड आरोग्य केंद्र म्हणून ओळखले जाईल, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.