MNS Foundation Day: राज ठाकरे आज पुण्यात, मनसे वर्धापन दिन सोहळ्यातील भाषणाकडे महाराष्ट्राचे लक्ष
Raj Thackeray | (Photo Credits: File Photo)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) आज आपला पंधरावा वर्धापन दिन (MNS Foundation Day) साजरा करत आहे. या वेळी मनसेचा वर्धापन दिन मुंबईत न होता पुणे (Pune) येथे पार पडतो आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बाहेर पडलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 9 मार्च 2006 रोजी मनसेची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात 13 आमदारांच्या रुपात मिळालेले जबरदस्त यश मनसेला हवा देऊन गेले. पुढच्या काही वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी गेले. मनसेच्या यशाला मोठीच ओहोटी लागली आणि कार्यकर्त्यांना गळती. अनेकांनी मनसेला राम राम केला. मधल्या काळात राज ठाकरे यांच्या आयुष्यातही मोठी वळणे आली. मग ते राज ठाकरे यांची स्वत:चे प्रकृती अस्वास्थ्य असो की त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांचे आजारपण असो. राज यांच्यावर परिणामकारक ठरतील अशा अनेक गोष्टी ठरल्या. त्यानंतर आता मनसे हळूहळू सावरते आहे. त्यामुळे आजच्या वर्धापन दिन सोहळ्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मनसेचा हा वर्धापन दिन यंदा पुणे येथे पार पडत आहे. पुणे येथील गणेश कला क्रिडा रंगमंच येथे वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम पार पडतो आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे काय बोलतात आपल्या कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मनसे कामाला तर लागली आहे. मात्र, आजच्या मेळाव्याच्या भाषणातून राज ठाकरे कार्यकर्त्यांना काय आदेश देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (हेही वाचा, ‘लढायचं ते जिंकण्यासाठीच' महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचा नवा नारा; यंदा पहिल्यांदाच मुंबई बाहेर मनसे वर्धापन दिन)

वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पुणे आणि महाराष्ट्रातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. आजवरचे जवळपास सर्वच वर्धापन दिन हे मुंबईत पार पडले आहेत. त्यामुळे मुंबईबाहेर मनसेचा वर्धापन पहिल्यांदाच पार पडतो आहे. त्यामुळेही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि कुतुहल आहे. या मेळाव्यासाठी पुण्याच्या बाहेरुन मुबंई, सातारा, सांगली, धुळे, जळगाव औरंगाबाद यासह महाराष्ट्रातून कार्यकर्ते पुण्यात येणार आहेत. मनसे नेते वसंत मोरे यांनी दावा केला आहे की, पुण्यात संपूर्ण महाराष्ट्रातून साधारणत: 8 ते 10 हजार मनसैनिक पुण्यात दाखल होणार आहेत.