MNS | PC: Twitter / MNS Adhikrut

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) यंदा 9 मार्च दिवशी 16वा वर्धापन दिन साजरा करणार आहे. राज्यात आता महानगरपालिका निवडणूकांची धामधूम येत्या काही महिन्यांत सुरू होण्याची चिन्हं आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता मनसे कडून देखील तयारीला सुरूवात झाल्याची चिन्हं आहेत. यावर्षी मनसे (MNS) पहिल्यांदाच मुंबई (Mumbai) बाहेर पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत आहे. नुकतेच जारी करण्यात आलेल्या एका पोस्टरवर 'लढायचं ते जिंकण्यासाठीच' हा नवा नारा झळकत आहे. तर वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुण्यात (Pune)  होणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या निवडणूका लवकरच जाहीर होण्याची चिन्हं आहेत. त्यापार्श्वभूमीवर मागील काही दिवसांपासून मनसे कडून तयारी सुरू झाली आहे. राज ठाकरे मागील काही महिन्यांपासून सातत्याने पुणे दौर्‍यावर आहेत. 7 मार्च ते 10 मार्च देखील राज ठाकरे पुणे दौर्‍यावर आहेत. यामध्ये 9 मार्चला मनसे पुण्यातील स्वारगेट येथे नेहरू स्टेडियम जवळील गणेश कला क्रीडा केंद्रावर वर्धापन दिन साजरा करणार आहे. या जाहीर सभेत राज ठाकरे अनेक महिन्यांनी मोठ्या रॅलीला संबोधित करणार आहेत. त्यामुळे ते कुणावर बरसणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. सध्या पुणे मनपाची सत्ता भाजपा कडे आहे.

मनसे ट्वीट

दरम्यान मनसे कडून जारी करण्यात आलेल्या वर्धापन दिन पोस्टर वर पहिल्यांदाच अमित ठाकरे यांचा चेहरा झळकत आहे. आदित्य शिरोडकर यांनी मनसेच्या विद्यार्थी सेनेला रामराम ठोकल्यानंतर रिक्त जागेवर अमित ठाकरे यांची वर्णी लागली आहे. काही दिवसांपूर्वीच अमित ठाकरे मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख असतील असे जाहीर करण्यात आले आहे.

सध्या राज ठाकरेंनी मुंबईतही शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना 'शाखा आहेत दुकान नाही त्यामुळे लोकांना त्रास न देता, त्यांच्यावर अन्याय न करता शाखा चालवायची असा सज्जड दम भरला आहे. तर 'कारभार ऐसे करावा, की रयतेच्या भाजीच्या देठासही हात न लावणे' या शिवरायांच्या दोन ओळींची फ्रेम प्रत्येक शाखेत पाठवायची आहे अशी इच्छा देखील बोलून दाखवली आहे.