राज ठाकरे इफेक्ट: उत्तर भारतीय नेत्यांना महाराष्ट्रात 'नो एंट्री'; उत्तर भारतीय महापंचायत समितीची घोषणा
राज ठाकरे, पक्षाध्यक्ष, मनसे (Photo Credit : Facebook,MNS, Adhikrut)

मुंबईतील कांदिवली येथे उत्तर भारतीयांच्या कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष (MNS chief) राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलेल्या भाषणाचा चांगलाच प्रभाव उत्तर भारतीयांच्या मनावर झालेल्या दिसत आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर उत्तर भारतीय नेत्यांना (खास करुन उत्तर प्रदेश आणि बिहार) महाराष्ट्रात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), बिहारमध्ये (Bihar) जोपर्यंत रोजगार नर्मिती करत नाही तोपर्यंत या नेत्यांना मुंबई, महाराष्ट्रामध्ये प्रवेश करु दिला जाणार नाही. उत्तर भारतीय महापंचायत समितीने (Uttar Bhartiya Manch) हा निर्णय घेतला आहे. कांदिवली येथील ज्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी हिंदीतून भाषण केले त्या कार्यक्रमाचे आयोजनही उत्तर भारतीय महापंचायत समितीने केले होते.

उत्तर भारतातले (बिहार, मध्य प्रदेश) नेते आपापल्या राज्यात स्थानिक रोजगार निर्माण करत नाही. त्यामुळे आम्हाला इतर राज्यांत रोजगाराच्या शोधात जावे लागले. त्यामुळे आमच्या लोकांना येथे अपमान सहन करावा लागतो. म्हणूनच या नेत्यांवर दबाव आणण्यासाठी आम्ही हा निर्णय घेत असल्याचे उत्तर भारतीय महापंचायत समितीने म्हटले आहे. (हेही वाचा, राज ठाकरे यांनी हिंदीतून केली उत्तर भारतीयांनीच कानउघडणी म्हणाले)

राज ठाकरे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

  • महाराष्ट्राची लोकसंख्या आज साडे तेरा कोटी आहे. त्यात इतर राज्यांतील लोक आल्यामुळे यंत्रणेवर ताण पडतो. त्याचा त्रास स्थानिकांना होतो.
  • महाराष्ट्रात उत्तर भारतीय खास करुन उत्तर प्रदेश, बिहारमधून लोक येतात. ते नोकरी, रोजगाराच्या उद्देशाने येतात. पण, माझे ठाम मत आहे की, कोणताही रोजगार प्रथम स्थानिकांना मिळायला हवा.
  • उत्तर प्रदेशातून अनेक पंतप्रधान निवडूण गेले. पण, तरीही उत्तर प्रदेश, बिहारचा विकास झाला नाही. यूपीतल्या तरुणांना राज्यातून बाहेर का पडावं लागतं याचा विचार तुम्ही का करत नाही?
  • तुम्ही कोणत्याही प्रदेशात जा. तिथे तुम्ही आगोदर तिथल्या राज्याची, प्रदेशाची भाषा शिकायला हवी.

    दरम्यान, परप्रांतियांमुळे महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे. हे कदापीही सहन केले जाणार नाही.

....म्हणून परप्रांतीयांना कल्याण येथे मारहाण

कल्याण येथे रेल्वे नोकरभरतीसाठी आलेल्या परप्रांतीय तरुणांना काही वर्षांपूर्वी झालेल्या मारहाणीबाबतही राज यांनी स्पष्ठ भाषेत भूमिका व्यक्त केली. ते म्हणाले, रेल्वेच्या नोकरीची जाहिरात महाराष्ट्रातील एकाही वृत्तपत्रात आली नव्हती. सर्व जाहिराती उत्तर प्रदेश, बिहारमध्ये आल्या होत्या. आम्ही केंद्रीय मंत्र्यांशी पत्रव्यवहार केला होता. आमचे लोक भेटण्यासाठीही गेले होते. चर्चेसाठी आमचे लोक गेले ती भाषा ऐकून तुम्हीही चिडला असता. आमचे लोक काय हातावर हात ठेवून बसणार का ? उद्या मराठी लोकांनी उत्तर प्रदेशात जाऊन अशी भाषा वापरली तर तुम्ही आरती काढणार का ? असा सवालही राज ठाकरे यांनी या वेळी विचारला. दरम्यान, राज ठाकरे यांचे व्यासपिठावर आगमन झाले, तेव्हा त्यांचे मंत्रोच्चाराने स्वागत करण्यात आले.