
महाराष्ट्र नवानिर्माण सेना राज ठाकरे यांना कोहिनूर मिल प्रकरणी ईडीची नोटीस बजावल्यानंतर आता वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. आज सकाळी मनसे प्रवक्ता संदीप देशपांडे यांनी ईडीची नोटीस म्हणजे भाजपाची हिटलरशाही असल्याचं म्हटलं आहे. आता याप्रकरणावर आक्रमक झालेल्या मनसेने 22 ऑगस्ट दिवशी ठाणे बंदची हाक दिली आहे. 22 ऑगस्ट दिवशी राज ठाकरे यांनी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. या बंदला प्रतिसाद न दिल्यास मनसे कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असं सांगत ठाणे , पालघर बंदचं आवाहन केलं आहे.(कोहिनुर मिल प्रकरणी राज ठाकरे यांना ईडी कडून नोटीस, भाजपच्या 'हिटलरशाही' विरोधात आवाज उठवणार संदिप देशपांडे यांची प्रतिक्रिया)
राज ठाकरे यांच्यासह कोहिनूर मिल प्रकरणी मनोहर जोशीचे चिरंजीव उन्मेष जोशीलादेखील नोटीस बजावली आहे. शिवसेना भवन समोर असलेल्या कोहिनुर मिल क्रमांक 3 च्या जागेवरील काही भागाचा लिलाव करण्यात आला होता. 421 कोटींना या जागेचा लिलाव झाला. लिलाव केल्यानंतर ही जागा मनोहर जोशी यांच्या मुलाने घेतली. यामध्ये राज ठाकरे, राजन शिरोडकर आणि मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेश हे तिघे समान भागीदार होते. या मिलच्या जागेची खरेदी करताना उन्मेश याने आयएल अॅण्ड एफएलस सोबत घेतले होते. कोहिनुर मिल प्रकरणी ईडीकडून करण्यात येणाऱ्या चौकशीसाठी सहकार्य करणार, उन्मेश जोशी यांची प्रतिक्रिया
राज ठाकरेंना ईडीची नोटिस बजावल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्येही अनेक चर्चांना उधाण आलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हा प्रकार म्हणजे दडपशाही असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरे यांना ईडीनं पाठवलेली ही नोटीस ही मोदी, शाह यांनी सुडबुद्धीनं केलेली कारवाई आहे. असा आरोपही बाळासाहेबांनी थोरातांनी लावत राज ठाकरेंना आपला पाठिंबा दर्शवला आहे.