
विधिमंडळ परिसरामध्ये जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्यानंतर गुरूवारी रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत त्याचे पडसाद पहायला मिळाले आहेत. पोलिसांनी मारहाण करणार्यांना सोडून मार खाल्लेल्या कार्यकर्त्याला अटक केल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांसह ठिय्या आंदोलन छेडले होते. विधानभवनाच्या गेट वर जितेंद्र आव्हाडांनी आंदोलन केल्याने काही काळ वातावरण तणावाचे झाले होते.
विधानभवन परिसरामध्ये जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख यांना पोलिस घेऊन जात असताना जितेंद्र आव्हाडांनी त्यांची गाडी अडवली. पोलिसांच्या गाडीखाली आव्हाड आडवे झाले त्यानंतर पोलिसांनी जितेंद्र आव्हाडांना अक्षरशः फरफटत बाहेर काढले. या आंदोलनाच्या वेळेस आमदार रोहित पवार देखील तेथे उपस्थित होते.
जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्त्यांसाठी ठिय्या आंदोलन
पडळकर यांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुख विधानभवनात याला मारहाण केली.यानंतर मारहाण करणारे विधानभवनातून पळून गेले.शिवाय पोलिसांनी माझ्याच मार खाणाऱ्या कार्यकर्त्याला पकडलं.आणि विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलिस स्टेशनला नेण्याचा घाट घातला आहे.
म्हणजे मार… pic.twitter.com/U3Jfnuyzm9
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 17, 2025
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राड्यानंतर दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई केली जाईल असे सांगितलं होतं मात्र गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याला पोलिसांकडून विशेष वागणूक दिली जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्याला पोलिस वडापाव आणून देतात, तंबाखू मळून देतात असा आरोप आव्हाडांनी केला आहे. गुन्हेगारांना तंबाखू मळून देणार्या इन्स्पेक्टर चव्हाणला निलंबित करा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तसेच मारहाण करणाऱ्या 5 जणांची पोलिसांकडून पाठराखण केली जात असल्याचंही ते म्हणाले आहेत.
दरम्यान आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. आज या प्रकरणाचे काय पडसाद उमटणार, कोणावर कारवाई होणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.