वाशी रेल्वे स्थानकात रेल्वेच्या पेंटाग्राफला लागली होती आग, विस्कळीत झालेली रेल्वे पूर्ववत सुरु
pentagraph Fire (Photo Credits: Twitter)

ऐन गर्दीच्या वेळी आज सकाळीच सकाळी हार्बर मार्गावरुन प्रवास करणा-यांना एका मोठ्या समस्येचा सामना करावा लागला. हार्बर मार्गावरील (Harbour Railway Line) वाशी रेल्वे स्थानकात एका लोकल गाडीच्या पेंटाग्राफला आग लागल्यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ANI ने दिलेल्या माहितीनुसार, वाशी स्थानकात रेल्वेच्या छपरावरील पेंटाग्राफमधून अचानक धूर येऊ लागल्याने हार्बर मार्गावरील पनवेलकडे जाणा-या गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या. मात्र आता ही रेल्वेसेवा पूर्ववत सुरु झाली असून  या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांची मात्र तारांबळ उडाली.

वाशी रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 3 वरील एका गाडीच्या पेंटाग्राफमध्ये अचानक बिघाड झाला. पेंटाग्राफनं पेट घेतला आणि बघता-बघता सगळीकडं धूर पसरला. त्यामुळं एकच गोंधळ उडाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशमन यंत्रांच्या मदतीनं तात्काळ हालचाल करून आग नियंत्रणात आणली. त्यानंतर ही गाडी कारशेडकडे रवाना करण्यात आली. मात्र, तोपर्यंत हार्बर मार्गावरील अनेक गाड्या रखडल्या होत्या. आता वाहतूक सुरू झाली असली तरी ती पूर्ववत व्हायला काही वेळ लागणार आहे.

ANI चे ट्विट:

अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले असून पनवेल दिशेने जाणा-या गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी पाहायला मिळत आहे.

याआधीही मागे 20 सप्टेंबरला वाशी-ठाणे ट्रान्सहार्बर मार्गावरील तांत्रिक बिघाडामुळे लोकल सेवा कोलमडली होती. तर ऐरोली-ठाणे दरम्यान पेंटाग्राफ तुटल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.