Karnataka Maharashtra Border Dispute: महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात नो एण्ट्री? कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईचं अजब वक्तव्य
Karnataka Chief Minister Basavaraj Bommai (Photo Credit: PTI)

महाराष्ट्र कर्नाटक सिमावाद शिगेला पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी पुन्हा एकदा अजब वक्तव्य केल्याने दोन राज्याच्या सिमेवर वाद भडकण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यात भाजपची सत्ता असली तरी सिमावादावरुन दोन्ही राज्य चांगलेचं आक्रमक झाल्याचं चित्र आहे. काहीच दिवसांपूर्वी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याबाबत दिल्ली दौरा करत भाजपाच्या अनेक वरीष्ठ नेत्यांची भेट घेतली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सिमावादावर कंबर कसली आहे. किंबहुना एक तालुका तर लांब पण महाराष्ट्रातलं एक गाव देखील कर्नाटकाला देणार नाही असं वक्तव्य केलं होतं. तर मंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यमंत्री शंभूराजे देसाई उद्या म्हणजेचं  ३ डिसेंबर रोजी बेळगाव तालुक्याचा दौरा करणार होते. पण आता हा दौरा पुढे ढकलण्यात आला असुन ६ डिसेंबर रोजी शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत पाटील बेळगावचा दौरा करणार आहे.

 

तरी महाराष्ट्राच्या (Maharashtra) मंत्र्यांनी सध्या बेळगावला भेट देऊ नये, असा इशारा कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई (Karnataka CM Basavaraj Bommai)  यांनी रामदुर्ग तालुक्यातील सालहळी गावात पत्रकारांशी बोलताना याबाबतची माहिती दिली आहे. सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र (Karnataka Maharashtra Border Dispute) राज्यात असलेली परिस्थिती पाहाता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी सध्या बेळगावला (Belgaum) भेट देऊ नये असं वक्तव्य कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलं आहे. (हे ही वाचा:- Karnataka CM Basavaraj Bommai to visit Belgaum: सीमाप्रश्न चिघळणार! कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई आज बेळगावी देणार भेट)

 

कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना फॅक्सद्वारे संदेश पाठवला आहे. आपल्या राज्याच्या सीमेच्या पलीकडील राज्यात असणाऱ्या कन्नड शाळांना (Kannada School) कर्नाटक सरकार अनुदान देणार आहे. कन्नड प्राधिकरणाच्या माध्यमातून शाळांना अनुदान देणार आहे .सोलापूर येथे कन्नड भवन उभारण्यासाठी दहा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे, अशी माहिती बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.