Hackers | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (Maharashtra Industrial Development Corporation)म्हणजेच एमआयडीसी (MIDC) चा सर्व्हर हॅक झाल्याचे राज्यात खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, एमआयडीसी सर्व्हर हॅक केल्यांतर हॅकर्सनी एमआयडीसीकडे 500 कोटी रुपये मागीतले आहेत. एमआयडीसीच्या अधिकृत मेल आयडीवर पाठवलेल्या मेलमध्ये तशी मागणी करण्यात आल्याचे प्रसारमाध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्त म्हटले आहे. गेल्या सोमवारपासून हा सर्व्हर हॅक झाल्याने एमआयडीसीच्या कार्यालयांतील कामकाज बंद पडले आहे. यात मुंबई शहरातील मुख्य कार्यालयांसह प्रादेशिक कार्यालयांचा समावेश आहे. या सर्व कार्यालयांमधील कामकाज ठप्प आहे. डेटा जर पूर्णपणे परत मिळवायचा असेल तर 500 कोटी रुपये द्या. अन्यथा सर्व डेटा नष्ट करु अशी धमकी हॅकर्सनी दिली आहे.

महत्त्वाचे असे की, एमआयडीसीशी संबंधित असणाऱ्या सर्व यंत्रणा ऑनलाईन प्रणालीशी जोडण्यात आलेल्या आहेत. या प्रणालीशी सर्व औद्योगिक वसाहती, उद्योजक, शासकीय घटक आणि विविध योजनांची संपूर्ण माहिती उपलब्ध असते. त्यामुळे गेल्या सोमवारपासून ही यंत्रणाच ठप्प झाली आहे. एमआयडीसीतील संगणक सुरु केला की त्यावर व्हायरस आढळून येत आहे. त्यामुळे जर या प्रणालीत प्रवेश केला तर संपूर्ण डेटाच नष्ठ होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामळे पूढील सूचना येईपर्यंत एमआयडीसीतील संगणक सुरु करु नये, अशा सूचना संबंधितांना देण्यात येत आहेत. (हेही वाचा, Google Chrome Extension द्वारे हॅकर्स चोरू शकतात तुमचा महत्त्वाचा डेटा, सर्वात आधी करा 'हे' काम)

एमआयडीसी सर्व्हर हॅक करणारे हॅकर्स हे देशातील आहेत की देशाबाहेरील याचा शोध घेणे सुरु आहे. तसेच, सर्व डेटा रिस्टोर करण्यासाठी सायबर सेलकडे तक्रार करावी, असा सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान, सर्व्हर हॅक झाल्याने संबंधित यंत्रणा कोलमडल्यासारखे चित्र आहे. त्यामुळे ही प्रणाली पूर्ववत होईपर्यंत कामकाजाची व्यवस्था पर्यायी सुरु करावी अशी मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, प्रादेशिक कार्यालये सुरु करण्यात आली आहेत.