Mumbai metro

मुंबई मेट्रो लाईन (Mumbai Metro)  2अ आणि 7 ज्या दहिसर (Dahisar) आणि अंधेरी (Andheri) दरम्यानच्या उपनगरांच्या पूर्व आणि पश्चिम बाजूने धावते, या दोन मेट्रो मार्गिका सुरू झाल्याच्या अवघ्या एका महिन्यात 20 फेब्रुवारीपर्यंत एकूण 44.26 लाख प्रवासी नोंदवले गेले आहेत. मेट्रो लाईन्स 2अ आणि 7 या दोन्ही मार्गांवर दररोज सरासरी प्रवाशांची संख्या जवळपास 1.47 लाख आहे. तसेच प्रवाशांची संख्या देखील हळूहळू वाढत असल्याची माहिती मिळाली आहे. डहाणूकरवाडी (Dahanukarwadi) स्थानकातून सकाळी 5.25 वाजता मेट्रो सेवा सुरू होते आणि शेवटची ट्रेन दहिसर पूर्वेकडून रात्री 11.11 वाजता सुटते. चारकोप डेपोला (Charkop Depot) जोडणारे डहाणूकर हे सर्वात जवळचे स्टेशन आहे जेथे या दोन्ही मेट्रो मार्गांचे रेक उभे आहेत.

23 जानेवारी रोजी ही सेवा सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशी, प्रवाशांची संख्या 84,929 होती. या दिवशी ही सेवा दुपारी 4 वाजता सुरू झाली होती आणि काही तासच सुरू होती. पुढच्या सोमवारी, 30 जानेवारी रोजी दोन्ही मार्गांवर एकूण 1.39 लाख प्रवाशांची नोंद झाली. सुरु झाल्या नंतरच्या तिसऱ्या सोमवारी, 6 जानेवारीला दोन्ही मार्गांवर एकूण 1.48 लाख प्रवासी संख्येने वाढ झाली.

अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, 14 फेब्रुवारी, व्हॅलेंटाईन डेला सर्वाधिक प्रवाशी संख्या नोंदवली गेली, ज्याने दोन्ही मार्गांवर एकत्रितपणे 1.59 लाख प्रवाशी संख्या पोहचली होती. महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) नुसार मेट्रो लाईन 7 वरील गुंदवली आणि मागाठाणे आणि मेट्रो लाईन 2अ वरील अंधेरी पश्चिम, दहिसर पूर्व आणि आनंद नगर येथे इतर स्थानकांच्या तुलनेत सर्वाधिक प्रवासी संख्या वाढली आहे.