Mumbai Local Train | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Mumbai Local Train Mega Block Updates: मध्य रेल्वेच्या (Central Railway) मुंबई विभागाने शुक्रवारी, 12 नोव्हेंबर 2023 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कार्ये सुलभ करण्यासाठी त्याच्या उपनगरी विभागांवर मेगा ब्लॉक (Mega Block) जाहीर केला आहे. मध्य रेल्वेने यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. मेगाब्लॉकमुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावरील सेवांवर सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 पर्यंत परिणाम होणार आहे.

सकाळी 10:48 ते दुपारी 3:49 पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या डाऊन स्लो सेवा सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येतील. गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि नंतर डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. तथापी, सकाळी 10:41 ते दुपारी 3:52 पर्यंत घाटकोपरहून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील. (हेही वाचा - Pune Accident: पुणे महामार्गावर भीषण अपघात, चार वाहनांचा धडकेत दोघांचा मृत्यू)

दरम्यान, सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्ग सकाळी 11:40 ते दुपारी 4:40 पर्यंत प्रभावित होईल. चुनाभट्टी/वांद्रे ते सीएसएमटी अप हार्बर मार्ग सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 पर्यंत प्रभावित होईल. ब्लॉक कालावधीत, वाशी/बेलापूर/पनवेल आणि वांद्रे/गोरेगावला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल/बेलापूर/वाशी आणि गोरेगाव/वांद्रे येथून अप हार्बर मार्गावरील सेवाही बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक 8) दरम्यान विशेष सेवा चालतील.

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेने शुक्रवारी सांगितले की, रविवारी दिवसाचा ब्लॉक नसेल आणि चर्चगेट ते मुंबई सेंट्रल (लोकल) स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक असेल.

एका अधिकृत निवेदनात पश्चिम रेल्वेने सांगितले की, ट्रॅक, ओव्हरहेड आणि सिग्नलिंग उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल (लोकल) स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर 00.15 वाजल्यापासून चार तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल (लोकल) दरम्यान सर्व जलद मार्गावरील गाड्या धिम्या मार्गावर चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील.