पर्यटकांमध्ये प्रसिद्ध अशी 'माथेरानची फुलराणी' (Matheran Mini Train) म्हणजेच माथेरानची मिनी ट्रेन वर्षभरासाठी पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. माथेरानच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेली ही ट्रेन वर्षभरासाठी बंद असल्या कारणाने पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. यंदा जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे नेरळ (Neral) ते माथेरान (Matheran) दरम्यान ब-याच ठिकाणी नुकसान झाले. यामुळे या मिनी ट्रेनच्या मार्गात ब-याच अडचणी येत आहेत. हे नुकसान भरून काढण्यासाठी साधारणत: वर्ष लागू शकते असे येथील प्रशासनाचे म्हणणे आहे.
जुलै महिन्यात पडलेल्या पावसामुळे नेरळ ते माथेरान मार्गावर 21 ठिकाणी रुळांखालील खडी पूर्णपणे वाहून जाणे, दरड कोसळणे, रुळ सरकणे यासह अन्य मोठे नुकसान झाले आहे. या दुरुस्तीसाठी साधारण वर्ष प्रत्येक वर्षी पावसाळ्यात नेरळ ते अमन लॉज मिनि ट्रेन सेवा बंद ठेवली जाते. फक्त अमन लॉज ते माथेरान अशी शटल सेवा सुरू असते. परंतु यंदा जुलै महिन्यातील पावसाळ्यात शटल सेवाही बंद ठेवावी लागली होती.
पावसाळ्यात झालेल्या या रेल्वेमार्गाचे नुकसान खूप मोठ्या प्रमाणावर असून त्याच्या दुरुस्तीसाठी अमाप खर्च होणार आहे. लोकसत्ता ने दिलेल्या वृत्तानुसार, एका समितीमार्फत या परिसराचे सर्व्हेक्षण केले जाईल. त्यानुसार रेल्वे बोर्डाकडे दुरुस्तीसाठी निधीचा प्रस्ताव पाठविण्यात येईल.
तसेच वर्षभर माथेरानची मिनी ट्रेन बंद असल्यामुळे तेथे जाणा-या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. तर माथेरानच्या पर्यटनावर देखील आर्थिक परिणाम होणार आहे.