Maratha Reservation: मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारवर सडकून टीका, पीएम नरेंद्र मोदींवर तीव्र नाराजी; मराठा आरक्षणासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी
Eknath Shinde, Manoj Jarange Patil | (Photo credit: archived, edited, representative image)

महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाची (Maratha Quota) मागणी जोर धरू लागली आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू ठेवले. यासंदर्भात आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाजाच्या विरोधात कट रचल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, आम्हाला 30 दिवसांची मुदत मागितली होती, आम्ही 40 दिवस दिले, त्यानंतरही मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्र सरकारला मराठा समाजातील मुलांचे भले करायचे नाही. सरकार ही गोष्ट जाणीवपूर्वक करत आहे. त्यांना आरक्षण द्यायचे नाही, हे यावरून स्पष्ट होत आहे. मराठ्यांची प्रगती रोखण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे हे षडयंत्र आहे’.

जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी येथील गुरुवारी झालेल्या भाषणावर नाराजी व्यक्त केली, ज्यात मराठा आंदोलनाचा उल्लेखही नव्हता. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जबाबदार धरले. जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी राज्यात मराठ्यांचे मोठे आंदोलन सुरू असल्याचे पंतप्रधान मोदींना का सांगितले नाही?’

ते म्हणाले, ‘पीएम मोदी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलले नाहीत. याचा अर्थ दोन गोष्टी आहेत. एक तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि डीसीएम यांनी पंतप्रधानांना माहिती दिली नाही किंवा पंतप्रधान मुद्दामहून या विषयावर बोलले नाहीत. ते राज्यात आले पण या विषयावर बोलले नाही. आम्ही त्यांच्या विरोधात नाही, तसे असते तर आम्ही त्यांचे हेलिकॉप्टर शिर्डीत उतरू दिले नसते. मात्र पंतप्रधानांनी या विषयावर बोलावे अशी आमची अपेक्षा होती.’

ते म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता देशातील गरिबांची गरज नाही. आम्हाला आशा होती की पंतप्रधान या विषयावर काही भाष्य करतील किंवा कदाचित मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न लवकर सोडवण्यास सांगतील. मात्र तसे घडले नाही.’ मराठा आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवावे, असे आवाहनही त्यांनी सर्वपक्षीय आमदारांना केले. याबाबत ते म्हणाले, ‘राजकारण्यांनी आमच्या गावात येण्याची गरज नाही. त्यांना आम्हाला मदत करायची असेल तर त्यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण विधेयक मंजूर करावे.’ (हेही वाचा: Sanjay Raut On Central Agencies: भाजप पराभवाच्या छायेत असेल तिथे केंद्रीय तपास यंत्रणांचे छापे- संजय राऊत)

आपल्या बेमुदत उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जरांगे-पाटील यांनी पाणीही पिणार नसल्याचे सांगत, वैद्यकीय तपासणी करण्यास नकार दिला. 29 ऑक्टोबरनंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होईल, असे संकेत त्यांनी दिले. ‘सरकार झोपले आहे. उपोषण हा पहिला टप्पा आहे. रविवारी आमची बैठक घेऊन आरक्षणासाठी पुढचे पाऊल ठरवू’, असे ते म्हणाले.