हिवाळी अधिवेशन: आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुस्लीम आमदार आक्रमक, राजदंड पळविण्याचा प्रयत्न; सभागृहाचे कामकाज तहकूब
महाराष्ट्र विधिमंडळ

Maratha, Dhangar, Muslim Society Reservation: अवघे जेमतेम दोन आठवडेच चालणाऱ्या विधिंमंडळ हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वादळी ठरला. मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर असताना इतर समाजांनीही आपापल्या आरक्षणाचा मुद्दा लाऊन धरला आहे. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पाहायला मिळाले. मराठा समाज आरक्षणाबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सरकारला प्राप्त झालाआहे. दरम्यान, मराठा, धनगर आरक्षणासोबतच मुस्लीम आरक्षणाचाही मुद्दा उपस्थित झाला. त्यावरुन मुस्लिम समाजाच्या आमदारांनी आक्रमक होत विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला.

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर अबू आझमी, आसिफ शेख, अब्दुल सत्तार, सतीश पाटील, अमीन पटेल आणि असलम शेख या सहा आमदारांची विधिमंडळात एकजूट पाहायला मिळाली. या आमदारांनी विधानसभा अध्यक्षांसमोरील राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. पण, त्याला यश आले नाही. या आमदरांनी विधानसभा अध्यक्षांच्या दिसेने कागदही भिरकावले. या वेळी राजदंड पळविण्याचा प्रयत्न दोन वेळा झाला. (हेही वाचा, हिवाळी अधिवेशन : शेतकऱ्यांसाठी 2200 कोटी रुपयांसह, 20 हजार 326 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर)

दरम्यान, सभागृहात झालेल्या गोंधळानंतर विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. सभागृहातील आजचा दिवस गदारोळातच पार पडला. आज सभागृहाचे कामकाज चौथ्यांदा तहकूब केले. आता दुपारी दोन वाजता सभागृहाचे कामकाज सुरु होणार आहे.