Prakash Ambedkar (Photo Credit _ Twitter)

Aarakshan Bachao Yatra: मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) महाराष्ट्रात अजूनही वाद सुरु आहे. त्यात अजून वाढ होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केल्याने, मराठा आणि ओबीसी समाजातील तणाव शिगेला पोहोचला आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी या आगीत उडी घेण्याची घोषणा केल्याने हा गोंधळ आणखी वाढण्याची भीती अधिक बळकट झाली आहे. आंबेडकर यांनी 25 जुलैपासून ‘आरक्षण बचाव यात्रा’ (Aarakshan Bachao Yatra) काढण्याची घोषणा केली आहे.

मंगळवारी छत्रपती संभाजी नगर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले की, त्यांची रॅली कोल्हापूरमार्गे छत्रपती संभाजी नगर येथे प्रवास करणार आहे. हा प्रवास पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातून जाणार आहे. राज्यातील एससी, एसटी आणि ओबीसी समाजाला दिलेल्या आरक्षणाचा बचाव करणे आणि एससी-एसटी समाजासाठी शिष्यवृत्तीची रक्कम दुप्पट करणे हा त्यांच्या आंदोलनाचा उद्देश आहे.

आंबेडकर म्हणाले की, अनेक ओबीसी संघटनांनी त्यांना ओबीसी समाजाच्या लढ्याची जबाबदारी स्वीकारण्याची विनंती केली आहे. मराठवाडा विदयापीठ नामांतर प्रकरणाची आठवण करून देत ते म्हणाले की, आता परिस्थिती भयावह होत आहे. श्रीमंत मराठ्यांनी ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटवला आहे. यामुळे ओबीसी नेते घाबरले आहेत.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी (शरद पवार गट), काँग्रेस आणि ठाकरे गटातील एकही मराठा नेता उपस्थित नव्हता. जोपर्यंत ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. तोपर्यंत कोणताही तोडगा निघणार नाही. मनोज जरांगे पाटील यांचे गरीब मराठ्यांसाठीचे आंदोलन सुरूच आहे. सत्ता श्रीमंत मराठ्यांची आहे. ते गरीब मराठ्यांना आरक्षण मिळू देत नाहीत. (हेही वाचा: Lok Sabha Polls: रवींद्र वायकरांच्या निवडीला Amol Kirtikar यांचे मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; केली निवडणूक ‘रद्द आणि निरर्थक’ घोषित करण्याची विनंती)

सामाजिक संस्थांना सोबत घेऊन 25 जुलैपासून दादर चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरु होणार आहे. ती कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड़, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, जालना या जिल्ह्यांमधून प्रवास करत, 7 किंवा 8 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजी नगर येथे या यात्रेची सांगता होणार आहे. अशाप्रकारे मराठा-ओबीसी संघर्षात आंबेडकरांच्या प्रवेशामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.