Lok Sabha Polls: नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Polls) एकनाथ शिंदे यांच्या गटातील रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या निवडीला आव्हान देत, शिवसेनेचे (यूबीटी) उमेदवार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कीर्तिकर यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत वायकर यांची मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून खासदार म्हणून झालेली निवडणूक ‘रद्द आणि निरर्थक’ घोषित करण्याची विनंती उच्च न्यायालयाला करण्यात आली आहे.
कीर्तिकर यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर यांचा वायकर यांच्याकडून 48 मतांनी पराभव झाला होता.
मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणी प्रक्रियेत त्रुटी असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून रीतसर आपणच निवडून आल्याचे घोषित करण्याची विनंतीही उच्च न्यायालयाला केली आहे. शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांचे पुत्र अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीच्या दिवशीच आपण फेरमतमोजणीची मागणी करणारी याचिका दाखल केल्याचा दावा केला. परंतु वैधानिक सूचनांकडे दुर्लक्ष करून घाईघाईने ती व्याचीका फेटाळण्यात आल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे. शिवसेना (UBT) नेत्याला 4,52,596 मते मिळाली, तर वायकर यांना 4,52,644 मते मिळाली. (हेही वाचा: Sharad Pawar On Jayant Patil and Chhagan Bhujbal: छगन भुजबळ भेट, जयंत पाटील पराभव; शरद पवार स्पष्टच बोलले)
मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीत स्पष्ट आणि गंभीर त्रुटी ठेवल्याचा दावा कीर्तीकर यांनी केला आणि त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर झाला. आपल्या याचिकेवर सुनावणी करताना कीर्तिकर यांनी संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग मागवण्याची विनंतीही न्यायालयाला केली आहे. रवींद्र वायकर यांच्या निवडीविरोधात अमोल कीर्तिकर यांनी दाखल केलेली ही दुसरी याचिका आहे. तत्पूर्वी, हिंदू समाज पक्षाचे दुसरे उमेदवार भरत शहा यांनी गेल्या महिन्यात याच मतदारसंघातील शिवसेना नेत्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्याच्या याचिकेवर अजून सुनावणी व्हायची आहे.