Maharashtra Agriculture Minister Manikrao Kokate (Photo Credits: ANI)

माणिकराव शिवाजीराव कोकाटे (Manikrao Kokate) हे महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील एक अनुभवी राजकारणी आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य असून, सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. डिसेंबर 2024 मध्ये, त्यांची महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रिपदावर नियुक्ती झाली. आता सरकारी कोट्याअंतर्गत फ्लॅट मिळवण्यासाठी फसवणूक आणि बनावट कागदपत्रे सादर केल्याच्या 30 वर्षे जुन्या प्रकरणात महाराष्ट्रातील नाशिक येथील न्यायालयाने गुरुवारी, राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला.

माजी मंत्री दिवंगत टीएस दिघोळे यांच्या तक्रारीवरून 1995 मध्ये दाखल झालेल्या प्रकरणात माणिकराव यांचा भाऊ सुनील कोकाटे यांनाही दोषी ठरवण्यात आले. कोकाटे भावंडांना येवलाकर मळा येथील कॉलेज रोडवर मुख्यमंत्र्यांच्या 10 टक्के विवेकाधीन कोट्याअंतर्गत दोन फ्लॅट मिळाले होते. यासाठी त्यांनी दावा केला होता की, त्यांच्याकडे स्वतःचे घर नाही आणि ते कमी उत्पन्न गटातील (LIG) आहेत. त्यावेळी दिघोळे यांनी या दाव्यावर अनियमिततेचा आरोप करत पोलिसांकडे धाव घेतली.

त्यानंतर कोकाटे भावंडांसह इतर दोघांविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता अंतर्गत फसवणूक, बनावटगिरी आणि इतर गुन्ह्यांचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी, नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दोन्ही भावांना दोषी ठरवले, तर एफआयआरमध्ये नाव असलेल्या दोघांना निर्दोष सोडण्यात आले. दुसरीकडे, न्यायालयात उपस्थित असलेले मंत्री कोकाटे यांनी पत्रकारांना सांगितले की, ‘मला या प्रकरणात जामीन मिळाला आहे आणि मी या आदेशाविरुद्ध अपील दाखल करेन.’ (हेही वाचा: Deputy CM Eknath Shinde Receives Death Threat: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवून देऊ; पोलिसांना मिळाला धमकीचा मेल, तपास सुरु)

हे प्रकरण 1997 पासून सुरु होते आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या निकालाने कृषिमंत्री यांची आमदारकी व मंत्रिपदही धोक्यात आले आहे. कारण लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते.