Indian Money | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कालपरवापर्यंत बेरोजगार (Umemployed Youths) असलेल्या आणि आजही तशाच स्थितत असलेल्या तरुणांच्या बँक खात्यावरुन तब्बल 100 ते सव्वाशे कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. ज्यामुळे नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मालेगाव मर्चेंट बँके (Malegaon Merchant Bank) शाखेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. बँकेच्या जवळपास 12 खात्यांवरुन हा व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. विशेष म्हणजे आपल्या नावे असलेल्या बँक खात्यावरुन इतक्या मोठ्या रकमेचे व्यवहार झाल्याची पुसटशी कल्पनाही या तरुणांना सुरुवातीला नव्हती. दरम्यान, शिवसेना पदाधिकारी आणि या तरुणांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या व्यवहारांबाबत लोकांना माहिती झाले.

नोकरीचे आमिष दाखवून उघडली बँक खाती

मालेगाव येथे घडलेल्या या धक्कादाक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्राप्त माहितीनुसार, सिराज अहमद नावाच्या एका इसमाने मालेगाव येथील काही बेरोजगार तरुणांची भेट घेतली. त्याने या तरुणांना नोकरीचे आमिष धाखवत त्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड आणि तत्सम काही कागदपत्रे घेऊन त्यावर त्यांच्या सह्यासुद्धा घेतल्या. या कागदपत्रांच्या आधारे त्याने नाशिक मर्चेंट बँकेच्या मालेगाव येथील शाखेत या तरुणांच्या नावे बँक खाती उघडली. नेमक्या याच खात्यावरुन एक दोन नव्हे तर तब्बल शंभर ते सव्वाशे कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. ज्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. हे सर्व व्यवहार पाठिमाच्या केवळ 10 ते 15 दिसांमध्येच झाले असून, अनेक तरुण हे आपणासोबत घडलेल्या प्रकाराबाबत अनभिज्ञ असल्याचेही समजते. (हेही वाचा, Nashik: नाशिकमध्ये फायरिंग ट्रेनिंग दरम्यान स्फोट; दोन अग्निवीर जवानांचा मृत्यु)

दरम्यान, या धक्कादायक प्रकारानंतर पीडित 12 तरुणांनी शिवसेना उमेदवार आणि मंत्री दादा भुसे यांच्याकडे मदत मागितली. त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी या तरुणांसोबत पत्रकार परिषद घेतली आणि चौकशीची मागणी केली. याबातब अप्पर पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देखील करण्यात आली आहे. हे व्यवहार नेमके कोणत्या बँक खात्यावरुन झाले, कोणी केले, कोणत्या कारणासाठी केले आणि हीच बँक खाती का वापरली? असे सवाल या तक्रारीत उपस्थित करण्यात आले आहेत. एबीपी माझाने याबाब वृत्त दिले आहे.

राज्यभरात विधानसभा निवडणूक 2024 ची धामधूम सुरु आहे. सहाजिकच नाशिक जिल्हाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे विधानसभा निवडणूक सुरु असताना अचानक एखाद्या बँक खात्यावरुन इतक्या मोठ्या रकमेचे व्यवहार व्हावेत यावरुन आश्चर्य व्यक्त होत आहे. या व्यवहारांचे आणि निवडणुकीत अवैधरित्या वापरल्या जाणाऱ्या पैशांचा तर संबंध नसावा ना? असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यासोबतच काही सायबर गुन्हेगार अथवा तोतया लोकांकडून तर हे व्यवहार होत नाहीत ना? याबाब शंका व्यक्त केली जात आहे. काहींना वाटते ही एक तांत्रिक चूक असावी. दरम्यान, या सर्व घडामोडींबाबत पोलीस काय भूमिका घेतात, याबाबत उत्सुकता आहे.