Mahrashtra Government Formation Live Updates: सर्वोच्च न्यायालय 'महाआघाडी'च्या याचिकेवर उद्या सकाळी 11.30 वाजता सुनावणी करणार
महाराष्ट्र
Siddhi Shinde
|
Nov 23, 2019 10:30 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षात अचानक सर्वात मोठे ट्विस्ट आल्याचे समजते, आज, 23 नोव्हेंबर रोजी सकाळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्याचे समजते. राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत हा शपथ विधी पार पडला. 24 तास पूर्वी पर्यंत महाविकासाआघाडीची सत्ता स्थापन होणार आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरु असताना आजचा हा अचानक पार पडलेला शपथविधी शिवसेनेला मोठा धक्का आहे. दुसरीकडे शपथविधी सोबतच राज्यातील राष्ट्रपती राजवट देखील रद्द करण्यात आली आहे.
ANI ट्विट
देवेंद्र फडणवीस यांनी शपथ विधी नंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिलेल्या माहिती नुसार,महाराष्ट्राला स्थायी सरकार मिळावे या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी पुढाकार घेऊन भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला. यासोबतच अन्य काही पक्षांनी देखील सोबत येणायचा निर्णय घेतला.असं असलं तरी अद्याप भाजपाला बहुमत सिद्ध करता आलेलं नाही राज्यपालांकडून यासाठी अवधी देण्यात येणार असून तत्पूर्वी राज्यात लवकर सत्ता स्थापन व्हावी यासाठी हे मोठे पाऊल उचलण्यात आल्याचे देखील फडणवीस यांनी सांगितले. यानंतर लवकरच बहुमत सिद्ध करून पाठोपाठ मंत्रिमंडळ विस्तार देखील करण्यात येईल असेही ते म्हणाले.
दरम्यान,फडणवीस यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याचे खापर शिवसेनेच्या माथी फोडले आहे. महायुती असतं सुद्धा सत्तास्थापनेसाठी इतर पक्षांकडे शिवसेना गेल्याने राज्यात ही परिस्थिती आली होती. मित्रपक्ष शिवसेनेला दिलेल्या आश्वासनाबाबत जरी वाद असले तरी सर्वात आधी राज्यातील जनतेला आम्ही वाचन दिले आहे आणि त्याच्या पूर्तीसाठी आज मी मुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.