Best Agricultural State 2024: कृषी क्षेत्रात महाराष्ट्राचा डंका! सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 2024 पुरस्काराने सन्मान; दिल्लीत पार पडणार सोहळा
Photo Credit- X

Best Agricultural State 2024: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा जडला आहे. महाराष्ट्राला कृषी क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार सर्वोत्कृष्ट कृषी राज्य 2024 (Best Agriculture State )जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री शिंदे(CM Eknath Shinde) आज दिल्लीत पुरस्कार स्वीकारणार आहेत. 15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने हा पुरस्कार जाहीर केला. भारताचे माजी सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल न्यायमूर्ती पी सथाशिवम यांच्या अध्यक्षतेखालील 15 व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने ही घोषणा केली. आज म्हणजे 10 जुलै 2024 रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हा पुरस्कार स्वीकारतील. (हेही वाचा:Maharashtra Budget for Farmers: कृषीपंप थकीत वीजबिल माफ, सौरउर्जा पंपास प्राधान्य; अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्पात विशेष घोषणा )

महाराष्ट्राच्या नाविन्यपूर्ण कृषी पद्धती

कृषी आणि ग्रामीण भागातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी या पुरस्कारासाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र सरकारच्या नाविन्यपूर्ण धोरणांना आणि उच्च-प्रभावी विकासात्मक उपक्रमांवर प्रकाश टाकतो. ज्यामुळे राज्यात कृषी आणि ग्रामीण समृद्धी प्रगती करत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

महाराष्ट्र सरकारने 21 लाख हेक्टर क्षेत्राचे देशातील सर्वात मोठे बांबू अभियान सुरू केले आहे. नुकत्याच आलेल्या अर्थसंकल्पात, महाराष्ट्र सरकारने केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने नंदुरबार जिल्ह्यात १.२० लाख एकर क्षेत्रफळाचा हरित पट्टा स्थापन करण्याची योजना जाहीर केली. महाराष्ट्र सरकारने 123 प्रकल्पांच्या अंमलबजावणीद्वारे अंदाजे 17 लाख हेक्टरमध्ये सिंचन क्षमता वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कृषी नेतृत्व पुरस्कार

ॲग्रिकल्चरल टुडे मासिकाने 2008 मध्ये वार्षिक कृषी पुरस्काराची स्थापना केली होती. हा पुरस्कार विविध भागधारक-सरकार, व्यक्ती आणि संस्था-ज्यांनी कृषी क्षेत्रात अनुकरणीय नेतृत्वाचे प्रदर्शन केले आहे, यांच्या योगदानाचा गौरव केला करते. यापूर्वी विद्यमान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आदींनी हा पुरस्कार पटकावला आहे.

भारतातील राज्यांपैकी महाराष्ट्र ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये महाराष्ट्राचे योगदान 12.92% आहे. राज्याचे दरडोई उत्पन्न राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. राज्याच्या सकल राज्य मूल्यापैंकी सुमारे 12.1 टक्के कृषी आणि संलग्न क्रियाकलापांचा वाटा आहे.