Rain | Representational Image (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्रात ऐन थंडीमध्ये पावसाळी वातावरण पहायला मिळत आहे. सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे वातावरणीय बदल दिसून येत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या कोकण, पुणे, मुंबई आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुढील 3 दिवस पाऊस बरसू शकतो. मराठवाडा, विदर्भामध्येही हलक्या सरींची शक्यता आहे. मागील 24 तासांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे सह काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला आहे. हा ट्रेंड पुढील काही दिवस असाच राहण्याची शक्यता आहे. अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिलं आहे. ठाणे, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि रायगडच्या काही भागांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात दक्षिण मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या भागातून कोकण ते उत्तर-मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. समुद्रातून बाष्प येत असल्याने राज्यातील हिवाळा गायब झाला आहे. सोबतच किमान तापमानात वाढ झाली आहे. तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसल्या आहेत. मुंबईत आजचं किमान तापमान 19.8 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे.

हवामान विभागाचा अंदाज

 

हवामान विभाग मुंबई, ट्विट

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस म्हणजे 9 जानेवारीपर्यंत पावसाचं वातावरण असेल. काही ठिकाणी हा पाऊस मेघगर्जनेसह बरसणार आहे तर मराठवाडा आणि विदर्भात 8 जानेवारीपर्यंत पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.