Monsoon| File Photo

महाराष्ट्रात यंदा मान्सूनची (Monsoon) एन्ट्री अगदीच दमदार झाली पण मागील काही दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस आता पुन्हा बरसण्यासाठी सज्ज झाला आहे. आज (8 जुलै) पासून महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज वेधशाळेकडून वर्तवण्यात आला आहे. जूनच्या मध्यानंतर अचानक पाऊस गुडूप झाल्याने उष्णता वाढली होती. ऐन जुलै महिन्यात अनेकांची उन्हाने, घामाने काहिली होत होती. पण आता मान्सून परतल्याने वातावरणात पुन्हा गारवा पसरला आहे. Mumbai Weather Forecast July 8: शहर, उपनगरांमध्ये सौम्य, मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता; 11:22 च्या सुमारास भरती.

कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या अनेक भागात अधूनमधून पावसाच्या सरी बरसण्यासाठी सुरूवात झाली आहे. अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण होत असतानाच बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत असल्याने आजपासून कोकण आणि विदर्भात आता मोसमी पाऊस पुन्हा जोर धरण्याची शक्यता आहे. राज्यात 10 जुलै पासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता देखील हवामान खात्याने वर्तवली आहे.

महाराष्ट्रात पाऊस लांबल्याने अनेक भागात पाणी टंचाई ची समस्या तर शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचं संकट घोंघावत आहे. यंदा दुबार पेरणी टाळण्यासाठी हवामान खात्याकडून सातत्याने अलर्ट्स दिले जात आहेत.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, अरबी समुद्रात सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण आहे. कोकणात 8,9 जुलैला पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रभाव कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरातून कमी बाष्पाचा पुरवठा होत आहे. परिणामी 11 जुलैला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. त्याचा फायदा विदर्भ, मराठवाडय़ासह मध्य भारतात होईल. या भागात 9 जुलै पासून पाऊस सुरू होईल तर 11 जुलै पर्यंत तेथे जोर वाढण्याची शक्यता आहे.